पवई तलावातील जलपर्णी काढण्याच्या कामाला वेग

आठच दिवसांमध्ये दीड हजार मेट्रिक टन जलपर्णीची विल्हेवाट


मुंबई : पवई तलावातील जलपर्णी,तरंगत्या वनस्पती काढण्याचे काम २३ मे २०२५ पासून अत्यंत वेगाने सुरू आहे. या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. मागील २३ मे २०२५ ते १ जून २०२५ या दहा दिवसांच्या कालावधीत १ हजार ४५० मेट्रिक टन इतकी जलपर्णी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जलपर्णी काढताना नैसर्गिक घटकांचे संरक्षण व संवर्धन करण्याची खबरदारीही महानगरपालिकेने घेतली आहे. विशेषत्वाने, तलावातील जलपर्णी हटवण्यासाठी सुरू केलेल्या कार्यवाहीला वेग देण्याकामी तात्काळ ५ संयंत्रे आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करावा, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार ही कामेसुरू आहेत.

पवई तलाव हा सन १८९१ मध्ये निर्माण करण्यात आला असून त्याचा संपूर्ण जलव्याप्त परिसर २२३ हेक्टर इतका आहे. जवळपास ६.६ किलोमीटरचा परिघ असलेल्या पवई तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६०० हेक्टर पर्यंत पसरलेले आहे. तलावाची जलधारणा क्षमता ही सुमारे ५ हजार ४५५ दशलक्ष लीटर इतकी आहे. पवई तलावाचे पाणी हे पिण्याव्यतिरिक्त इतर प्रयोजनासाठी उपयोगात येते. पवई तलाव परिसरात वाढलेले नागरिकरण आणि तलावामध्ये येणारे सांडपाणी इत्यादी कारणांनी तलावामध्ये जलपर्णी, इतर अनावश्यक वनस्पतींची वाढ
झाली आहे.

पवई तलावातून मागील सहा महिन्यांत २ संयंत्राद्वारे सुमारे २५ हजार मेट्रिक टन इतकी जलपर्णी हटविण्यात आली आहे. तरीही, जलपर्णी वाढीचा वेग अधिक असल्याने ती तलाव क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. ज्या गतीने जलपर्णी काढली जात आहे, त्यापेक्षा कित्येक पट अधिक गतीने जलपर्णी वाढत आहे. एकूणच, जलपर्णीच्या आच्छादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पवई तलावात सांडपाणी, मलजल मिसळत असल्याने जलपर्णी मोठ्या प्रमाणावर फोफावते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी मलजल वाहिन्या अन्यत्र वळविणे हाच कायमस्वरूपी तोडगा आहे. जोपर्यंत मलजल वाहिन्या वळविण्याचे काम पूर्ण होणार नाही, तोपर्यंत जलपर्णी काढण्याची गती अधिक वाढवावी, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाने दिले आहेत.


त्यानुसार, जलपर्णी काढण्याची कार्यवाही अधिक प्रभावी होण्याकामी ५ संयंत्रांद्वारे काम अधिक वेगाने सुरू करण्यात आले आहे. हार्वेस्टर मशीन, पंटून माउंटेड पोकलेन आणि पोकलेन, डंपर या यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ही कामे सुरू आहेत. त्यासाठी दोन सत्रांमध्ये अधिकचे मनुष्यबळ वापरले जात आहे. पावसाळ्यानंतर ६ संयंत्रे तैनात करण्यात येणार आहेत. जलपर्णीची मुंबई महानगराबाहेरील डम्पिंग ग्राऊडवर विल्हेवाट लावण्यात येत आहे. तलावातील जलपर्णी काढताना जैव विविधतेस कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी' या संस्थेच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली जात आहे.

Comments
Add Comment

नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची संधी

वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती महाराष्ट्र-बाडेन वुटेमबर्ग राज्यांदरम्यान संयुक्त

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; जमीन मोजणीच्या शुल्कात मोठी कपात

मुंबई : राज्य सरकारने महसूल प्रशासन अधिक सशक्त करण्यासाठी अनेक बदल राबवले असून, आता शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

चेंबूरमध्ये शिक्षणासाठी पाच किलोमीटर पायपीट

मराठी शाळेअभावी विद्यार्थ्यांचे हाल मुंबई : चेंबूर येथील वाशीनाका परिसरात पालिकेच्या मराठी माध्यमाची

मुंबईतील अनधिकृत झोपड्यांवर ‘नेत्रम’ची नजर

बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील