Saturday, June 14, 2025

रशियाच्या महत्वाच्या एअरबेसवर युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला, 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!

रशियाच्या महत्वाच्या एअरबेसवर युक्रेनचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला, 40 लढाऊ विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!

युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियाची ४० हून अधिक बॉम्बर्स नष्ट! 


किव्ह: युक्रेनने रशियाच्या ओलेन्या आणि बेलाया या दोन महत्त्वाच्या हवाई तळांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. युक्रेनियन सैन्याने या हल्ल्यासाठी ड्रोनचा वापर केला. लक्ष्य करण्यात आलेली दोन्ही हवाई तळं रशिया-युक्रेन सीमेपासून बरीच आत आहेत. महत्वाचे म्हणजे, हा हल्ला आपण केलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला असल्याचे युक्रेनियन सूत्रांनी म्हटले आहे.


युक्रेनने रशियाच्या अशा हवाई तळांना लक्ष्य बनवले आहे, ज्यांचा वापर रशिया त्यांच्यावर बॉम्बिंग करण्यासाठी करत होता. यासंदर्भात बोलताना युक्रेनच्या सुरक्षा सेवेच्या (SBU) अधिकाऱ्याने सांगितले की, आपण रशियातील अनेक हवाई तळांवर ड्रोनने हल्ले केले आहेत. या हल्ल्यांत रशियाचे ४० हून अधिक बॉम्बर्स नष्ट झाले आहेत. याच विमानांचा वापर रशिया युक्रेनवर बॉम्बिंग करण्यासाठी करत होता. युक्रेनचे म्हणणे आहे की, हीच विमाने युक्रेनवर घिरट्या घालत होते आणि बॉम्बिंग करत होते. यामध्ये त्यांनी रशियात दूरवर जाऊन Tu-95, Tu-22 आणि महागडे तथा दुर्मिळ A-50 या हेरगिरी करणाऱ्या विमानांवर यशस्वी निशाणा साधल्याचे म्हंटले आहे,


एसबीयूने म्हटले आहे की, "बेलाया" या एअर बेसवर हल्ला झाला. जे रशियातील इर्कुत्स्क भागात आहे. याशिवाय, "ओलेन्या" एअर बेसवरही आग लागल्याचे वृत्त आहे.  रशियन माध्यमांनी या भागात ड्रोन हल्ल्याची पुष्टी केली आणि प्रत्युत्तरात हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याचे सांगितले.


रशियाने युक्रेनवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या उत्तरादाखल हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.  युक्रेन हवाई दलाचे प्रवक्ते युरी इग्नाट यांनी सांगितले की, रविवारी युक्रेनवर ४७२ ड्रोन आणि सात क्षेपणास्त्रे डागण्यात आली, ज्यामध्ये युक्रेनियन सैन्याने ३८५ हवाई लक्ष्ये निष्प्रभ केल्याचे वृत्त आहे. इस्तंबूलमध्ये थेट शांतता चर्चेच्या नवीन फेरीच्या तयारी दरम्यान या घडामोडी घडल्या आहेत, जिथे युक्रेनचे संरक्षण मंत्री रुस्तेम उमरोव्ह कीवच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की म्हणाले की युक्रेन "आपल्या स्वातंत्र्याचे, आपल्या राज्याचे आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्यासाठी सर्वकाही करत आहे". रविवारी युक्रेनियन सैन्याच्या प्रशिक्षण युनिटवरही प्राणघातक रशियन क्षेपणास्त्र हल्ला झाला, ज्यामध्ये किमान १२ सैनिक ठार झाले आणि ६० हून अधिक जखमी झाले, ज्यामुळे कमांडच्या अपयशाची अंतर्गत चौकशी सुरू झाली.



युद्धबंदीच्या चर्चेपूर्वीच जोरदार हल्ला


रशिया आणि युक्रेनमधील शांतता चर्चा सोमवारपासून सुरू होणार आहे, दोन्ही देशांचे शिष्टमंडळ तुर्कीमधील इस्तंबूल येथे भेटणार आहेत. मात्र या चर्चेपूर्वी, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या वचनबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हटले की वाटाघाटी अर्थपूर्ण होण्यासाठी, उद्दिष्ट स्पष्ट असणे आवश्यक आहे, त्यासाठी चर्चाचे विषय योग्यरित्या तयार असणे आवश्यक आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >