काैतुकाने : बोलू मराठी!

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर


दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बाई डॉ. विजया वाड यांनी एका उपक्रमात सहभागी करून घेतले होते. एका प्रथितयश कंपनीतील निवडक अधिकारी वर्गाला संभाषणात्मक मराठी शिकवण्याचा तो उपक्रम होता. मी आठवड्यातून दोनदा कंपनीत जायचे. रोजचे कामाचे तास संपवून सर्व प्रशिक्षणार्थी सभागृहात उत्साहाने यायचे. त्यांना संवादात भाग घ्यायला आवडायचे. जमेल तसे मराठी बोलण्याची त्यांची तयारी असायची आणि प्रश्न तर इतके पडायचे की त्यांची उत्तरे देताना माझी दमछाक व्हायची.


अमराठी भाषकांना मराठी शिकवणे हे आज अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आहे. मुंबई सारख्या शहरात रोजगारासाठी विविध राज्यांतून लोक येतात. काही ना काही कारणाने परदेशस्थ लोकही येतात. महाराष्ट्रात राहायचे तर वेगवेगळ्या टप्प्यांवर मराठी भाषेतून संभाषण करणे अपरिहार्य आहे हे ओळखून तशी व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे. सुहास लिमये नि जयवंत चुनेकर यांचे यासाठीचे योगदान उल्लेखनीय आहे. मुंबई विद्यापीठाच्या जर्मन विभागाने यासाठी अत्यंत शिस्तबद्ध काम केले आहे. पुस्तके, शैक्षणिक साधने यांचावर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पुण्यात विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एमकेसीएल’ने हा विषय हाती घेतला आहे.


संवादी मराठीचे तंत्र विकसित करण्याचा दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पुण्यातील नीती बडवे यांचे या विषयावरील लेखन नोंद घेण्याजोगे आहे. मला आठवते, मराठीच्या वर्गात पहिल्या वर्षी अमराठी विद्यार्थी असायचे. त्यांना कवितेचा किंवा गद्य वेच्याचा अर्थ समजावून सांगताना चक्क हिंदी इंग्रजीचाही आधार घ्यायला लागायचा. आमच्या वाङ्‍‍मय मंडळात अशी विविध मुले असायची, जी कार्यकर्ते म्हणून सहज वावरायची आणि हसत खेळत मराठी शिकायची.


अक्सा खान ही मुलगी मला आमच्या वाङ्‍‍मय मंडळातच भेटली. हिंदी, उर्दू इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असणारी ही मुलगी अत्यंत सुंदर मराठी बोलते. गोड आवाज आणि शब्दांचा चपखल वापर यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे निवेदन करण्यात तिचा हातखंडा होता. वाङ्‍‍मय मंडळाच्या कार्यक्रमांचे निवेदन आणि नेतृत्व दोन्ही जबाबदाऱ्या ती समर्थपणे पेलायची.


देव शहा नावाचा एक मुलगा असाच गुजराती, मराठी, हिंदी, इंग्रजी अशा चारही भाषा अवगत असणारा होता. काही दिवसांपूर्वी विज्ञान शाखेच्या बुशरा या मुलीशी माझी नुकतीच ओळख झाली. बुशराने कामगार दिनावरच्या ‘घामाचे सोने’ या नाटुकल्यात उत्तम भूमिका केली. तिचे मराठी बोलण्याचे, शिकण्याचे प्रामाणिक प्रयत्न आणि धडपड मी जवळून अनुभवते आहे.फ्रेंच, जर्मनसारख्या भाषा नव्या संवादात्मक पद्धतीने अलीकडे शिकवल्या जातात. या पद्धती आवर्जून समजून घेतल्या पाहिजेत. अमराठी भाषकांसाठी मराठीचे अभ्यासक्रम तयार करणे ही काळाची गरज आणि मोठे आव्हान आहे. विद्यापीठांचे या विषयाकडे तितकेसे लक्ष गेलेले नाही. महाराष्ट्र राज्याने नेहमीच भिन्न भाषकांना आपल्या भूमीत उदारपणाने सामावून घेतले आहे.

मराठीचा बोलू अनेकांनी कौतुकाने बोलण्यासाठी कल्पक अभ्यासक्रमांची आणि नव्या कल्पनांची गरज आहे.

Comments
Add Comment

हरकी’: महिलांच्या यशाची किल्ली

दी लेडी बॉस-अर्चना सोंडे बंगळूरुच्या गजबजलेल्या टेक्नॉलॉजी विश्वात ५ मार्च २०१५ हा दिवस तिच्यासाठी अत्यंत

मन उधाण वाऱ्याचे

 मोरपीस - पूजा काळे  वेड्या मना गुंतताना

एआय आणि सायबर गुन्हेगारी

डॉ. दीपक शिकारपूर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्हेगार चलाख पद्धतीने गुन्हे करत आहेत. गुन्हेगार

kokan: येवा कोकण आपलोच आसा!

खाचखळग्यातून जाणारी वाट कडेकपारी पार करत थेट सह्याद्रीच्या पायथ्याशी जाऊन मिळते, जिथे मातीचा कण न् कण धुरळा होत

वकिली सेवा पुरवणारी ‘रेस्ट द केस’

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधी चढू नये, असं म्हटलं जातं. कारण कोर्ट-खटला यामध्ये खूप वेळ जातो. सर्वांत

खादी ग्रामोद्योगाची सुवर्ण कामगिरी

भारतातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उत्पादन,