MSRDC कडून राज्यात सुरू असलेल्या कामांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा

कामात हयगय करणारे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (MSRDC) कडून सुरू असलेल्या विविध रस्ते विकास कामांचा वेग वाढवा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील शक्य तेवढी कामे मॉन्सूनआधी पूर्ण करावीत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. एमएसआरडीसीच्या वतीने राज्यात सुरू असलेल्या राज्यातील विविध विकास प्रकल्पांचा त्यांनी आढावा घेतला.यावेळी त्यांनी ही सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि सर्व अधिकारी उपस्थित होते.



मुंबई- नाशिक महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती द्यावी


मुंबई - नाशिक महामार्गाचा आढावा घेऊन महामार्गावरील रखडलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश दिले. मान्सूनपूर्वी ज्या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण होणार नाही त्याचे डांबरीकरण करून रस्ता वाहतूक करण्यास योग्य बनवावा, या मार्गावरील ३१ किलोमीटरचे काँक्रीटीकरण होणे अद्यापही बाकी आहे, तसेच पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज येथील काम रखडले आहे या कामांना तत्काळ गती द्यावी, कंत्राटदार ही कामे वेळेत पूर्ण करण्यास हयगय करत असल्यास त्यालाही नोटीस पाठवून ताकीद द्यावी असेही सांगितले. रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक मागून घ्यावा आणि हे काम येत्या महिन्याभरात पूर्ण करावे असेही सांगितले. या महामार्गावरील कशेळी येथील खाडीवरील पुलाचे काम ऑक्टोबरपर्यंत तर कळवा येथील खाडी पुलाचे काम जून महिन्याअखेर पूर्ण होणार आहे. येत्या पावसाळ्यात ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतुक सुरळीत व्हायला हवी असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.



मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची मिसिंग लिंक डिसेंबर अखेर होणार पूर्ण


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असल्याने ते नियोजनबद्धरित्या पूर्ण करावे असे सांगितले. तसेच हे काम येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल.


तसेच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हा महामार्ग ६ ऐवजी १० मार्गिकांचा करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसीच्या विचाराधीन असून विक एन्डला फिरायला जाणाऱ्या लोकांना दिलासा देण्यासाठी हे काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. १४.९०० कोटी रुपये या कामासाठी लागणार असून चार ठिकाणी नव्याने बोगदे तयार करावे लागणार आहेत.



पुणे रिंगरोडच्या कामात बाधित होणाऱ्या १० हजार झाडांचे पुनरोपण करणार


पुणे रिंगरोडचे कामही सुरू झाले असून, यात एकूण १२ पेकेजेस आहेत. यातील ०९ पेकेजेसची कामे सुरू झाली आहेत. या रिंग रोडच्या कामात बाधित होणाऱ्या १० हजार झाडांचे पुनरोपण होणार आहे. यात प्रामुख्याने वड, पिंपळ, गुलमोहर अशा देशी झाडांचा समावेश आहे. यातील ४ हजार झाडांचे पुनरोपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून अजून ५ हजार झाडे याच पद्धतीने पुनरोपण करण्यात येणार आहे. पुण्यातील माणिकचंद संस्थेच्या मदतीने हे काम शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात येत असून बाधित शेतकऱ्यांचा शेतात किंवा मग रिंग रोडच्या बाजूने या झाडांचे पुनरोपण करून त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.



नवीन अ‍ॅक्सेस कंट्रोल रस्त्यामुळे कोकणचा कायापालट


कोकणात सुरू असलेल्या रेवस रेड्डी सागरी महामार्गावर ९ ठिकाणी खाडीवर पूल उभारण्याचे काम सुरू आहे. यात रेवस-कारंजा, रेवदंडा, आगरदांडा, केळशी, काळबादेवी, दाभोळ, जयगड अशा खाडीपुलांचा समावेश आहे. यातील काही पुलांची कामे प्रगतीपथावर असून या कामांची गती वाढवावी असे सांगितले.


तसेच कोकणात प्रस्तावित असलेल्या कोकण द्रुतगती एक्सेस कंट्रोल महामार्गाचा कामाला गती देण्यास सांगितले. या महामार्गामुळे मुंबई आणि सिंधुदुर्ग हे अधिक जवळ येतील तसेच कोकणात जलद पोहोचणे शक्य होईल.



कोकणातील निवारा केंद्राच्या कामाचा वेग वाढवावा


कोकणात वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीवेळी नागरिकांच्या तात्पुरत्या निवाऱ्यांची सोय व्हावी यासाठी एमएसआरडीसीच्या वतीने ८६ निवारा केंद्रे उभारण्यात येणार होती. यातील ३७ निवारा केंद्राचे काम प्रगतीपथावर असून या कामाना वेग देण्याचे निर्देश दिले. तसेच शक्यतो शाळांच्या जवळ ही निवारा केंद्र उभारावीत जेणेकरून पावसाळ्यानंतर शाळांना त्यांचे उपक्रम राबवण्यासाठीही ही निवारा केंद्रे वापरता येतील असे सांगितले.



शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधा


नागपूर ते गोवा हे १८ तासांचे अंतर अवघ्या ८ तासांवर आणणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचा आजच्या बैठकीत आढावा घेतला. या महामार्गाला कोल्हापूर, लातूर, धाराशिव, बीड येथे होत असलेला विरोध लक्षात घेता ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचा विरोध मावळण्यासाठी प्रयत्न करावा असे सांगितले. समृद्धी महामार्गप्रमाणे नागपूर आणि गोवा एकमेकांना जोडून संपूर्ण ऍक्सेस कंट्रोल ग्रीड तयार करण्याचे आपले उद्दिष्ट असून त्यातून १२ जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा विरोध कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.



नवीन महाबळेश्वरच्या कामाला गती द्यावी


महाबळेश्वरच्या पायथ्याला नवीन महाबळेश्वर विकसित करण्याचे काम एमएसआरडिसीने हाती घेतले असून तिथे सुरू असलेल्या कामांचा आज आढावा घेतला. यात आधी २३५ तर आता २९४ गावे नव्याने समाविष्ट करण्यात आलेली आहेत. या भागात असलेल्या औषधी वनस्पती पाहता डाबर, पतंजलीसारख्या कंपन्यांना आमंत्रित करावे, तसेच वेलनेस सेंटर, निसर्गोपचार केंद्र याना प्रोत्साहन द्यावे. नव्याने धबधबे, इको फ्रेंडली रस्ते विकसित करून येथील नागरिकांना इथेच रोजगार मिळू शकेल यासाठी प्रयत्न करावेत असे सुचवले.


तसेच याठिकाणी तापोळा येथील उत्तेश्वराच्या मंदिराचे काम, उत्तेश्वर रोप वेचे काम याचीही प्रगती जाणून घेतली. तसेच या कामांची गती वाढवण्यास सांगितले.


एमएसआरडीसीला शासनाने अनेक प्रकल्प शासनाने दिले असून ते दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, तसेच सिडको, एमएमआरडीएप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सहभागी व्हावे असे सांगितले. एमएसआरडीसीची कामे ज्याठिकाणी सुरू आहेत तिथे राडारोडा दूर करून बेरिकेड्स बसवावेत. पुलाखाली उत्तम झाडे लावून सुशोभीकरण करावे. तसेच पावसाळ्यापूर्वी करायच्या कामांना प्राधान्य देऊन ती सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत असे निर्देश शिंदे यांनी या बैठकीत दिले.

Comments
Add Comment

नवले पुलावरील अपघातानंतर ‘लूटमारी’चा व्हिडिओ व्हायरल ; नागरिकांमध्ये संतापाची लाट!

Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ गुरुवारी (दि. १३) सायंकाळी झालेल्या साखळी अपघाताने संपूर्ण शहर हादरले. काही क्षणांतच दोन

विदर्भाची बाजी! राज्यातील १३ विद्यापीठांमध्ये ‘या’ विद्यापीठाला अव्वल क्रमांक; पुणे शेवटच्या स्थानी

नागपूर : विदर्भाने पुन्हा एकदा राज्यात आपली ताकद दाखवत गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्रातील १३ सार्वजनिक

दहशतवादी संघटनेसाठी काम करणाऱ्या जुबेरच्या लॅपटॉपमध्ये १ टीबी संशयास्पद डेटा! पुणे एटीएसचा तपास सुरू

पुणे: अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याच्या संशयातून पुण्याच्या एटीएसने जुबेर हंगरगेकर

व्हिडीओची सत्यता तपासण्याचे वन विभागाचे आवाहन

सोशल मीडियावरील एआय बिबट्याच्या व्हायरल व्हिडीओमुळे भीतीचे वातावरण जुन्नर  : पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक