आत्मतेजाचे सूर निनादावेत

ऋतुराज:ऋतुजा केळकर


‘यज्ञं कुर्वन्ति साधवः,
हव्यं ददति भक्तितः।
अग्नौ समर्प्य मोहं तत्,
ज्ञानं लभते मानवः॥
यागे समस्तं विश्वं स्थितं,
धर्मः तत्र प्रवर्तते।
आत्मत्यागेन यो यजेत्,
स एव मुक्तिं प्राप्नुयात्॥
हविर्दानं सदा शुद्धं,
यज्ञकर्म सुशोभितम्।
तेन संतोषयेत् देवाः,
कृपां वर्षयन्ति सदा॥


दत्त यागात आहुती देता देता माझ्या मनात ही आर्या उमटली. याग संपल्यावर ती लेखणीतून उतरवता उतरवता त्याचा अर्थ देखील मनात उतरवण्याचा प्रयत्न केला. या आर्येचा अर्थ असा आहे की, ‘सज्जन व्यक्ती यज्ञ करतात आणि भक्तिभावाने हवन अर्पण करतात. अग्नीमध्ये मोहाचा त्याग केल्याने मनुष्याला ज्ञानप्राप्ती होते. यागामध्ये देखील संपूर्ण विश्वाचा समावेश होतो आणि तिथेच धर्माचा प्रवाह सुरू असतो. जो आत्मत्यागाने याग करतो, तोच मुक्ती प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच हवन आणि दान हे नेहमीच विशुद्ध विचारांनी केले गेले पाहिजे. अर्थात यज्ञाने देव प्रसन्न होतात आणि सतत कृपा वर्षाव करतात.


आता यात बरेच प्रश्न मनात अर्थातच निर्माण होतात त्यातील महत्त्वाचा एक प्रश्न म्हणजे, “यज्ञ आणि याग यातील प्रमुख फरक तो काय?” तर यज्ञ आणि याग हे वैदिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचे विधी आहेत. यज्ञ हा व्यापक संकल्पनेतून जन्म घेतो, तर याग हा विशिष्ट उद्देशाने केला जातो.


यज्ञाचा उद्देश केवळ धार्मिक कर्मकांड नसून आध्यात्मिक उन्नती, सृष्टीचे संतुलन आणि समाजकल्याण हा आहे. ज्यामध्ये अग्निहोत्र, हवन आणि देवतांना समर्पण केले जाते. आत्मशुद्धी, पर्यावरण शुद्धीकरण आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याकरिता यज्ञ केले जातात. अर्थात यज्ञाचे अनेक प्रकार आहेत. अग्निहोत्र, सोमयज्ञ, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ हे आणि अनेकानेक यज्ञ असतात. अर्थात प्रत्येक यज्ञाचा उद्देशही वेगळा असतो. त्यातील काही यज्ञ व्यक्तिगत उन्नतीसाठी, तर काही सामाजिक आणि राजकीय स्थैर्यासाठी केले जातात. अगदी सरळ शब्दात सांगायचं झालं तर, अध्यात्म हे केवळ ग्रंथांत बंदिस्त नाही, तर ते त्या यज्ञातील ज्वलंत अग्नीमध्ये आहे, जो यज्ञात प्रज्वलित होतो आणि अज्ञानाचे अंधार नष्ट करतो. यज्ञातील अग्नी म्हणजे संवादाचा शुद्धतम आविष्कार आहे की जो शब्दांपेक्षा खोल आणि अस्तित्वाच्या तळापर्यंत भिडणारा असतो. तो केवळ जळतच नाही, तर तो शोधतो डोळस बनून, पोळतो आपल्याच सावलीला की जी शोधात असते आपल्या मोक्षाच्या मार्गांना आणि पुन्हा पुन्हा उजळतो अनंताच्या ऋतू भारणीतून. त्या ज्वालांनी भस्म होते ते स्वार्थ, अहंकार आणि अंधश्रद्धा यांचे आणि उरते ते फक्त आणि फक्त निर्व्याज समर्पण. हा अग्नी फक्त जळण्यासाठी नाही, तो प्राणिमात्रांची जीवनशिखा उजळण्यासाठी आहे. त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय त्याची खरी तेजस्विता उमगणार नाही.


अर्थात त्याच्या धगीत, तापलेल्या लालीत एक मौन आहे, जे शब्दांच्या पलीकडचे आहे आणि त्या प्रज्वलित ज्वाळांमध्ये एक गूढ गाणं आहे, जे फक्त आहुती देणाऱ्यालाच ऐकू येतं. तो अग्नी आहे एक समर्पणाचा श्वास, आवाज एका तपाचा, स्पर्श आहे मोक्षाचा, जो दिसतो विधात्याच्या हस्ताक्षरासारखा सटवीच्या रुपात लिहून जाणारा आपलं गुढ भविष्य आणि जाणवतो तो फक्त स्पंदनासारखा दुधारी बंदिशीसारखा समस्त सृष्टीचा एक अलवार पण तप्त स्पर्श. खरंतर यज्ञ हा नुसता एक विधी नाही तर तो, एका गूढ स्पंदनाचा उच्चार आहे, जिथे मंत्रांची ध्वनी लहरी अंतराळाच्या विस्तीर्ण पटावर उमटतात, आणि त्या तरंगांनीच सृष्टीचे संतुलन साधले जाते. खरंतर सृष्टीचे संतुलन म्हणजे काय असं म्हणाल तर तो असतो दृश्य आणि अदृश्य यांचा एक असा तणाव एक असा संवाद की जो चालू आहे, पण कधीही पूर्ण होत नाही. हे संतुलन म्हणजे जणू वाऱ्याची लयबद्ध हालचाल किंवा समुद्राची मनातून... अगदी आतून तयार होणारी तृष्णा... पृथ्वीच्या श्वासाचा न संपणारा खेळ... असा दोन टोकांचा संवाद आहे हा... जीवन आणि मृत्यू, प्रकाश आणि अंधार, सृष्टी आणि संहार यातील कधीच न संपणारा... अविरत चालूच राहणारा.


खर पाहायला गेलं ना तर तो कुठेच स्पष्ट असा दिसतच नाही, पण प्रत्येक ठिकाणी सृष्टीचे संतुलन म्हणजे दृश्य आणि अदृश्य यांचा तणाव-एक संवाद जो चालू आहे, पण कधीही पूर्ण होत नाही. हे संतुलन म्हणजे वाऱ्याची लयबद्ध हालचाल, समुद्राची आतून ओढणारी तृष्णा आणि पृथ्वीच्या श्वासाचा न संपणारा खेळ. तो दोन टोकांचा संवाद आहे. जीवन आणि मृत्यू, प्रकाश आणि अंधार, सृष्टी आणि संहार. स्पष्ट असा तो कुठेच दिसत नाही, पण जाणवतो अगदी पावलोपावली कधी जाणवतो तो पानांच्या थरथरीत, तर कधी गगनाच्या लयीत, अगदी माणसाच्या अनिश्चित धडपडीतही तो सदैव आपलं अस्तिव दाखवून देत असतो. पण तरीही त्या संतुलनाची गोडी वेडसर आहे, कारण ते कधीच स्थिर नाही. ते आहे अपूर्णतेच्या सौंदर्यात, म्हणूनच त्या अग्नीची खरी धग त्याच्या सतत बदलणाऱ्या स्वरूपातच आहे.


अर्थात सृष्टीही नेहमीच न वाचता समजून घ्यावी लागते, तरच तिचे संतुलन अनुभवता येते नाहीतर नाही. जिथे प्रत्येक लय, प्रत्येक विराम आणि प्रत्येक श्वास संपूर्ण असतो, तरीही अपूर्ण असतो.


असतो तो पानाच्या थरथरीत, गगनाच्या लयीत, आणि माणसाच्या अनिश्चित धडपडीत. त्या संतुलनाची गोडी तशी वेडसरच आहे. कारण याच अपूर्णतेत पूर्णत्वाचे सौंदर्यात आहे आणि खर सौंदर्य हे सतत बदलणाऱ्या स्वरूपात आहे. म्हणूनच सृष्टी न वाचता समजावी लागते आणि तिचे संतुलन फक्त अनुभवता येते कारण जिथे प्रत्येक लय, प्रत्येक विराम, आणि प्रत्येक श्वास संपूर्ण असतो, तरीही अपूर्ण असतो.


आजच्या काळात, कोणत्याही श्रद्धाळू व्यक्ती याग करू शकते, कारण यागाचा मुख्य उद्देश आध्यात्मिक उन्नती आणि सृष्टीचे कल्याण आहे. याग करण्यापूर्वी संकल्प केला जातो, म्हणजेच यागाचा उद्देश स्पष्ट केला जातो. यागाच्या प्रारंभी अग्निप्रज्वलन केले जाते आणि अग्नीला देवतेचे स्वरूप मानले जावून त्याच्याच साक्षीने याग सुरू होतो. मंत्रोच्चाराद्वारे देवतांचे आवाहन केले जाते. यागाच्या शेवटी पूर्णाहुती दिली जाते, म्हणजेच अंतिम समर्पण केले जाते. यागाच्या फलश्रुतीसाठी देवतांचे आशीर्वाद मागितले जातात आणि उपस्थित व्यक्तींना प्रसाद दिला जातो. पण याग हा केवळ हवनकुंडात आहुती देण्याचा क्रम नसतो, तो आत्मसाक्षात्काराचा एक प्रवास असतो. आर्त हृदयाने अर्पण केलेले हव्य, त्या आगीत जळत नाहीत, तर एका दिव्य तेजात परिवर्तित होतात-जिथे समर्पणाचे धगधगते कण ब्रह्मतेजाचा उगम घडवतात. हे कर्मकांड नाही तर हा आहे एक संवाद मृत्यूच्या अंधाराशी, जीवनाच्या प्रकाशाशी आणि मानवाच्या चिरंतन अन्वेषणाशी. यज्ञ असो अगर याग यांच्या ज्वाळांमध्ये भस्म होतो तो अहंकार, आणि त्या अग्निरिंगणातून उमलते एक नितळ, निर्व्याज, शाश्वत प्रकाश की जो केवळ माणसासाठी नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी आहे.


अखेरीस इतकच सांगेन की, यज्ञ आणि याग हे केवळ विधी नाहीत, तर ते एक शाश्वत संवाद आहेत. माणसाचा सृष्टीशी, अग्नीशी, आणि त्यांच्या आत्मतेजाशी. यात आहे संयम, आहे एक तप की जे जन्मते तेजासोबत.


याग म्हणजे एक हळवा स्पर्श की जिथे मंत्रांची गूंज वाऱ्याच्या लयीत मिसळते आणि तुपाचा सुगंध स्पर्श करतो पृथ्वीच्या आतल्या गाभ्याला. तो एक आश्वासन आहे,जीवन-मृत्यूच्या सीमांवर उभा राहून, सृष्टीच्या संतुलनाची भाषा बोलणारा.


यज्ञ आणि याग कधीच संपत नाहीत, ते सतत मनाच्या गाभ्यात उजळत राहतात. अग्नीच्या त्या मंद धगधगीत एक गूढ शांतता असते, जिथे संपूर्ण विश्वाचा श्वास ऐकू येतो. ज्वाळांसोबतचा हा संवाद पृथ्वीच्या अंतःकरणात मिसळतो आणि जो समर्पण करणाऱ्या आत्म्याला स्पर्श करतो. ही आहुती एका क्षणात देऊन संपत नाही; ती मनाच्या गाभ्यात सतत पेटत राहते आणि त्या अग्नीच्या प्रकाशात युगांयुगे. हे अवस्था अगदी माझ्या शब्दात सांगायची झाली, तर मी इतकेच म्हणेन,


यज्ञाच्या ज्वालांत तेज जळावे...
तपाच्या ओठांवर मंत्र उमटावे...
समर्पणाच्या साक्षी भस्म व्हावे...
आत्मतेजाचे सूर निनादावे...
हृदयातून हृदयात अनेकांच्या !

Comments
Add Comment

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट होईल.

माता शैलपुत्रीच्या आवडत्या फुलाचे रोप नवरात्रीत घरात नक्की लावा, देवीच्या आशीर्वादाने घरात भरभराट

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी

नवरात्र उत्सवात गरबा नृत्यावर पावसाचे पाणी -विनायक बेटावदकर कल्याण शहरात मोठ्या उत्साहात गणपती उत्सव साजरा