३२ कोटींचे ‘गणित’ जुळविण्यात होणार अनेकांचा ‘हिशोब’!

‘ईडी’च्या कारवाईनंतर रेड्डी समर्थक चिंतेत


गणेश पाटील


विरार : नालासोपाऱ्यातील ४१ अवैध इमारतीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराची पाळेमुळे शोधण्यासाठी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत वसई-विरार महानगरपालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याकडे सापडलेल्या ३२ कोटींच्या घबाडाचा ईडी कडून होणारा "हिशोब" आता अनेकांचे "गणित" बिघडविणारा ठरणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे रेड्डींचे "खास" म्हणून मिरविणारे अधिकारी कर्मचारीच नव्हे तर राजकीय पक्षाचे पदाधिकारी सुद्धा चिंतेत पडले आहेत. वसई-विरार पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड आणि मलनिस्सारण प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर अवैधरित्या ४१ इमारती बांधून त्यातील खोल्या व सदनिका गरीब नागरिकांना विक्री करण्यात आल्या. बांधकाम करण्यात येत असलेल्या इमारती अवैध असतानाही विक्री केल्यामुळे सामान्य नागरिकांची फसवणूक केली म्हणून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिताराम गुप्ता आणि अरुण गुप्ता यांच्यासह आणखी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. हाच धागा पकडत अंमलबजावणी संचालनालय ईडीने कारवाई सुरू केली असल्याचे स्पष्ट केले आहे. ईडीच्या पथकाने दोन दिवस वसई विरार, बोरिवली, मुंबई आणि हैदराबाद येथे १३ ठिकाणी छापेमारी करून अनेक गुन्हेगारी कागदपत्र जप्त केल्याचे म्हटले आहे. ईडीच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात महापालिका नगररचना विभागाचे उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्याकडे २३ कोटींचे दागिने आणि ९ कोटी रुपये रोख स्वरूपात सापडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र इतर १२ ठिकाणी केलेल्या कारवाईत नेमके काय घबाड हाती लागले याबाबत ईडीकडूनच काही सांगण्यात आलेले नाही.


दरम्यान, केवळ ४१ इमारतीच्या अवैध बांधकामात गुप्ता आणि रेड्डी यांनी कोट्यवधीची माया जमविली. हे कोणालाही न पटण्यासारखे आहे. त्यामुळे रेड्डी यांच्याकडे सापडलेल्या ३२ कोटींच्या घबाडाचा "हिशोब" आता ईडीकरून सुरू करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे ईडीने केलेल्या छापेमारीतील १२ ठिकाणे कोणती आणि त्या ठिकाणाहून ईडी पथकाच्या हाती काय लागले हे अद्याप उजेडात आलेले नाही.


त्यामुळे रेड्डी यांच्याकडून कोणतीही वैध - अवैध काम करून घेण्यात बाद 'शहा' असलेल्या एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह बांधकाम क्षेत्रातील रेड्डी यांचे खास मित्र ईडीने सांगितलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कागदपत्रांबाबत चिंतेत पडले आहेत. महापालिकेचे काही कर्मचारी, अधिकारी हे सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटलेल्या वाय. एस. रेड्डी यांच्या फाईल, मध्यस्थी आणि "रेट"ची चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्याने विचारात पडले आहेत.


कारवाईची नव्हे; दागिने आणि रोख कमी मिळाल्याची चर्चा


महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानातून हिरेजडित दागिन्यांसह रोख अशाप्रकारे ३२ कोटींहून अधिक रुपयांचा मुद्देमाल ईडीने जप्त केला आहे. या कारवाईनंतर वसई-विरारमध्ये सुरू असलेल्या चर्चेत आणखी इतर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याच्या चर्चेपेक्षा रेड्डी यांच्याकडे सापडलेले दागिने आणि रोख कमी असल्याबाबतचीच चर्चा जास्त प्रमाणात होत आहे. रेड्डी यांच्यावर ‘वरकमाई’नुसार सापडलेले दागिने आणि रक्कम निम्म्याहून कितीतरी कमी असल्याबाबत होत असलेली चर्चा ‘चर्चेचा विषय’ बनली आहे.


वादग्रस्त कारकिर्दीतील आत्मविश्वास नडला


शासकीय सेवेत लाच देण्याच्या प्रकरणात अडकून वादग्रस्त अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली असतानाही, रेड्डी यांनी अवैध कमाईचा फंडा सोडला नाही. वसुलीचा मार्ग मात्र त्यांनी सावधरीत्या जोपासला. नुकतेच त्यांच्याच विभागातील एका महिला अधिकाऱ्याची सायबर भामट्यांकडून ६० लाख रुपयांनी फसवणूक झाली. तेव्हा ‘वरकमाई’चे पैसे अशाप्रकारे ‘व्हाईट’मध्ये न ठेवण्याचा उघड सल्ला देणाऱ्या रेड्डी यांच्याच घरात इतके मोठे घबाड सापडल्याने, अनेक जण त्यांच्या या अती आत्मविश्वासू वृत्तीबाबत कोड्यात पडले आहेत.

Comments
Add Comment

वसईत आयकर विभागाच्या धाडी, हॉटेल व्यवसायिकाच्या मालमत्तेची छाननी

वसई : राज्यात नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान सुरू असताना वसईत आयकर विभागाने एका हॉटेल व्यावसायिकाच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

वाडा नगराध्यक्षपदासाठी चुरशीची लढत

कुडूस  : वाडा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी चार उमेदवार रिंगणात असून वाडा नगरपंचायत निवडणुकीत खरी लढत ही

वसई-विरारमध्ये ५२ हजार दुबार मतदार

मतदारांकडून लिहून घेणार हमीपत्र विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

चार नगर परिषद निवडणुकीसाठी १२५ मतदान केंद्र ; प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

पालघर : पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू, जव्हार, या नगर परिषद आणि वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

विरारमध्ये ११ वर्षांच्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू; पालिकेच्या गार्डनमध्ये दुर्घटना

विरार : विरारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या गार्डनमधील तलावात खेळता खेळता पाय घसरल्याने ११