Exclusive : मुंबई दरवर्षी का तुंबते? धक्कादायक माहिती वाचून तुमचाही होईल संताप अनावर!

मिठी नदी गाळ काढणी घोटाळ्यात भ्रष्ट अधिका-यांचे 'सिंगापूर दर्शन' – एसआयटीचा गौप्यस्फोट


तर पकडलेले आरोपी म्हणताहेत, 'चोर सोडून संन्याशाला फाशी'!


मग नेमके चोर कोण? त्यांना अटक कधी होणार?


मुंबई : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची नवी आणि लज्जास्पद कहाणी समोर आली आहे. मिठी नदीच्या गाळ काढणी घोटाळ्यात केवळ कोट्यवधींचा अपहारच नाही, तर महापालिकेच्या अभियंत्यांना परदेशी सहली घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (SIT) केला आहे.


आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाच्या तपासात समोर आले आहे की, अधिका-यांनी मध्यमवर्गीय मुंबईकरांचे पैसे खाल्ले आणि त्यातून सिंगापूर- दुबईची मजा केली गेली. अभियंता प्रशांत रामगुडे याने चक्क सिंगापूरची ट्रिप परिवारासह मारली, तीही घोटाळेबाज केतन कदमच्या खर्चाने! इंटरकॉन्टिनेंटल हॉटेलसारख्या आलिशान ठिकाणी मुक्काम, आणि याचे सारे पुरावे SIT च्या हाती लागले आहेत. दुबईच्या ट्रिपसाठीही हॉटेल बुकिंग केतन कदमनेच केलं होतं, हे स्पष्ट झालं आहे.


या घोटाळ्यात मुख्य संशयित असलेल्या केतन कदम (Woder India LLP) आणि जयेश जोशी (Virgo Specialities Pvt. Ltd.) याला अटक करण्यात आली आहे. जयेश जोशी हा एक उपकरण पुरवठादार असून त्याने गाळकाढणीसाठी सिड-पुशर मशिन्स विविध कंत्राटदारांना दिल्या होत्या. मात्र, महापालिकेशी थेट करार किंवा व्यवहार नसल्याचा दावा जोशीकडून करण्यात आला आहे. तरीसुद्धा, ईओडब्ल्यूच्या एफआयआरनुसार, तब्बल ६५ कोटींचा अपहार करण्यात आला आहे.


तपासात समोर आलेली आणखी एक गंभीर बाब म्हणजे, प्रशांत रामगुडे याचे एका ब्यूटी पार्लरमध्ये काम करणा-या महिलेशी अत्यंत जवळीक असल्याचा संशय आहे. SIT च्या माहितीनुसार, या महिलेच्या खात्यामार्फत रामगुडे लाच स्वीकारत असल्याचा दाट संशय असून, याचा तपास सुरू आहे.


SIT च्या आरोपांनुसार, या संपूर्ण प्रकरणात अधिकारी, कंत्राटदार आणि उपकरण पुरवठादार यांनी संगनमताने हा घोटाळा रचला. परंतु अद्याप अनेक मोठ्या अधिका-यांवर कारवाई झालेली नाही.


जयेश जोशीच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की, जोशी हा केवळ खासगी पुरवठादार असून त्याचा बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा महापालिकेशी थेट काही संबंध नाही. त्यामुळे त्याच्या विरोधातील आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे.


मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या प्रकरणात आरोपी जय जोशी यांच्या वतीने डॉ. युसुफ इक्बाल आणि YNA लीगल एलएलपीचे अ‍ॅड. झैन श्रॉफ यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की तो एक स्वतंत्र गुंतवणूकदार आणि पायाभूत सुविधा पुरवठादार आहे जो कायदेशीररित्या मशीन आयात करतो आणि त्याचा तो मालक आहे. खाजगी करारांनुसार, कोणत्याही थेट देयक किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेशी करारबद्ध सहभागाशिवाय या मशीन विविध कंत्राटदारांना भाड्याने देण्यात आल्या होत्या.


या मशीन बृहन्मुंबई महानगरपालिकेला भाड्याने देण्यात आल्या नव्हत्या. एमसीजीएम किंवा इतर कोणाकडूनही जोशी यांना कोणताही आर्थिक फायदा किंवा चुकीचा फायदा झालेला नाही. आरोपांनुसार, प्रत्यक्ष निविदा लाभार्थी - कंत्राटदार - आणि निविदा अनियमिततेसाठी जबाबदार असलेले अधिकारी अद्यापही निष्प्रभ राहिले आहेत आणि त्यांची चौकशीही झालेली नाही.


"आमचा क्लायंट, जो भाड्याने मशीन पुरवणारा तृतीय-पक्ष खाजगी विक्रेता आहे, त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे आणि एमसीजीएमशी दूरस्थपणे संबंधित नसतानाही या कथित घोटाळ्यात ओढले जात आहे. अशा प्रकारे, त्याची सततची अटक पूर्णपणे अनुचित आहे," अ‍ॅड. श्रॉफ म्हणाले.


दरम्यान, न्यायालयाने सरकारचा पुढील पोलीस कोठडीचा अर्ज फेटाळला आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवले. पण, या सगळ्या घोटाळ्याचा केंद्रबिंदू असलेले अधिकारी ज्यांनी मुंबईच्या नागरिकांचा विश्वासघात केला ते मात्र अजूनही मोकाट आहेत.


म्हणूनच प्रश्न पडतो, मुंबईत दरवर्षी गाळ का साचतो? आणि हे गाळ फक्त नदीतच का? की, भ्रष्ट अधिका-यांच्या मानसिकतेतही? याचा विचार करणार कोण?

Comments
Add Comment

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा