भाजपामध्ये करणार प्रवेश
मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव क्रिकेटनंतर आता राजकीय इनिंग सुरू करणार आहे. केदार जाधव लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
केदार जाधव याने या आधी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते आशिष शेलारांचीही भेट घेतली होती. त्यावेळी केदार जाधव हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केदार जाधव याचा पक्षप्रवेश होणार आहे. मुंबईतील भाजपाच्या कार्यालायात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचं सांगितलं जातं आहे.
केदार जाधव हा मूळचा पुण्याचा आहे. महाराष्ट्राकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारा केदार जाधव भारताकडूनही खेळला आहे. त्याने भारतासाठी ७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४२.०९ च्या सरासरीने १३८९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ६ अर्धंशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्याने २७ विकेट्सही घेतल्या आहेत. केदार जाधवने केवळ ९ टी-२० सामन्यांमध्ये २०.3३३ च्या सरासरीने १२२ धावा केल्या आहेत. तर कसोटीमध्ये त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता क्रिकेट नंतर तो राजकारणाचे मैदान गाजवणार आहे.