अमरावती : महामार्गावरून गावाला परत जाणाऱ्या युवकांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर, दुसरा युवक गंभीर जखमी असल्याची घटना सावर्डीजवळील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ घडली. राहुल संजय डिवरे (२६) रा. शिवणगाव फत्तेपूर असे मृतकाचे तर, रोशन गजानन पांडे (२५) रा. शिवणगाव फत्तेपूर असे जखमीचे नाव आहे. घटनेनंतर बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती.
घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, राहुल व रोशन हे दोघे दुचाकीने अमरावतीवरून राष्ट्रीय महामार्गाने गावी शिवणगाव फत्तेपूरला जात होते. सावर्डीजवळ असलेल्या रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ अचानक मागून आलेल्या भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात राहुलचा जागीच करुण अंत झाला. तर, रोशन जखमी झाला. अपघातानंतर त्यांच्या दुचाकीने पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला व जखमी रोशनला तातडीने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. घटनेनंतर अपघात बघण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. काहींनी बचावकार्य केले.
PM Modi : पंतप्रधान मोदी बुधवारी ‘नवकार महामंत्र दिवस कार्यक्रमात’ उपस्थित राहणार
दरम्यान, वाहतूक कोंडी झाल्याने बराचवेळ वाहतूक ठप्प झाली. नांदगाव पेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयात पाठवले व वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.