दोन भागांच्या सफाईला सुरुवात, तिसऱ्या भागातील कंत्राट निवडीचा वाद
मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात मिठी नदीतील गाळाची सफाई अद्याप झालेली नसून या मिठी नदीच्या निविदेतील अटींमुळे कमी बोली लावूनही कंत्राटदाराला काम न देता दुसऱ्या क्रमांकावरील कंत्राटदाराला काम देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे मिठी नदीची निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचे रुंदीकरण तसेच खोलीकरण करून या नदीला पुनर्रुज्जीवन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून खर्च करण्यात आले आहे. तरीही दरवर्षी मिठी नदीतील गाळ सफाईवर सरासरी ९० कोटी रुपये खर्च केले जात असून या गाळ सफाईच्या कामातील अनियमिततेबाबत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरु असतानाच आता ठराविक काही कंपन्यांनाच गाळ सफाईचे काम मिळावे यासाठी मायनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पोकलेन मशिनचा वापर करण्याची अट निविदेत घालण्यात आली होती.
मात्र, याबाबतची निविदा अंतिम झाल्या आहेत. या निविदेत नदीतून गाळ काढण्यासाठी १०५ फुट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करण्याची अट घालण्यात आली होती. परंतु कमी बोली लावून यासाठी काम पात्र ठरलेल्या कंपनीला केवळ यासाठी या पोकलेन मशीन करता करारपत्राची प्रत न दिल्यामुळे एका गटाचे काम दुसऱ्या क्रमांकावरील कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
महापालिकेच्यावतीने मिठी नदीच्या पहिल्या भागासाठी पात्र ठरलेल्या त्रिदेव कंस्ट.क्शन आणि दुसऱ्या टप्प्यातील पात्र ठरलेल्या भूमिका कंस्ट.क्शन कपंनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील टिचर कॉलनी ते बीकेसी कनेक्टर पूलापर्यंतच्या कामासाठी लघुत्तम ठरणाऱ्या कंपनीला पोकलेन मशीन संदर्भात एनओसी तथा कराराची प्रत सादर न करता आल्याने महापालिकेने दुसऱ्या क्रमांकावरील जेआरएस इन्फ्रास्ट.क्चर या कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे या तिसऱ्या भागातील मिठी नदीच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
मिठी नदीच्या कामांमध्ये गाळ काढण्यासाठी १०५ फुट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीनचा वापर करण्याची अट ही काही कंपन्यांना डोळयासमोर ठेवूनच टाकली गेली होती. परंतु यामध्ये एकच कंपनी दोन कामांमध्ये लघुत्तम ठरल्याने दोन्ही ठिकाणची कामे संबंधित कंपनीला देणे बंधनकारक असताना पोकलेन मशीनची सेवा घेणाऱ्या कंपनीने त्यांची अडवणूक करून त्यांच्याशी करार न केल्याने पात्र असूनही संबंधित कंपनीला दुसऱ्या भागातील काम मिळवता आलेले नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्या बाबींसाठी संबंधित कंपनी न्यायालयात गेली होती, तीच भीती प्रत्यक्षात निविदा खुल्या झाल्यानंतर दिसून आल्याने मिठीच्या सफाईच्या कामांमधील कंत्राटदारांचे संगनमत उघड होत आहे.
दरम्यान, नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ७ लाख ३९ हजार ९८८ मेटीक टनच्या तुलनेत २५८१ मेटीक टन एवढाच गाळ काढला गेला आहे. हा गाळ पश्चिम उपनगरांमधील नाल्यांचा असून शहर आणि पूर्व उपनगरांमधील नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही,असे दिसून येत आहे.