सोलापूर : उन्हाच्या तडाख्याने वाढलेल्या उकाड्यामुळे घराच्या गच्चीवर झोपायला गेलेल्या दिनेश नरहरी क्षीरसागर (रा. अकोलेकाटी, ता. उत्तर सोलापूर) यांच्या घरातून चोरट्यांनी एक लाख ६८ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी त्यांनी सोलापूर तालुका पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शहर-जिल्ह्यात सध्या घरफोडी, चोरीचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे. अनेकजण उकाड्यामुळे घराचा दरवाजा उघडा ठेवतात किंवा मोठ्या आवाजाचा कुलर लावतात. काहीजण घराच्या स्लॅबवर किंवा अंगणात झोपतात. या संधीचा फायदा घेऊन चोरटे त्यांचा डाव साधत आहेत. अकोलेकाटी येथील क्षीरसागर कुटुंबीय रात्री जेवण करून घराच्या गच्चीवर झोपायला गेले होते. घराला लहान कुलूप लावले होते.
Akola Crime : संतापजनक! विषारी अन्न खायला देऊन २५हून अधिक कुत्र्यांचा बळी
चोरट्यांनी मध्यरात्री सगळेजण झोपी गेल्याची संधी साधून कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यांच्या कपाटातील साहित्य उचकटले, पण त्यांना त्यात काही मिळाले नाही. त्यानंतर लॉकर तोडले आणि त्यातील गंठण, अंगठ्या, लॉकेट, कर्णफुले, पैंजण व एक मोबाईल, असा ऐवज चोरून नेला, असेही फिर्यादीत नमूद आहे. अद्याप पोलिसांच्या हाती काहीही लागले नसून पोलिस हवालदार पंकज महिंद्रकर तपास करीत आहेत.