Friday, May 9, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Raj Thackeray : मनसेचा गुढी पाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, राज ठाकरे काय बोलणार ?

Raj Thackeray : मनसेचा गुढी पाडवा मेळावा, शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, राज ठाकरे काय बोलणार ?
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा रविवार ३० मार्च २०२५ रोजी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.



राज ठाकरेंच्या मनसेची स्थापना ९ मार्च २००६ रोजी झाली. पक्षाच्या स्थापनेला १९ वर्षे पूर्ण झाली. मनसेने २० व्या वर्षात पदार्पण केले आहे. या विशीत असलेल्या पक्षाची सध्याची स्थिती विचारात घेतली तरी सत्तेत थेट असलेला वाटा शून्य म्हणावा लागेल. लोकसभेच्या निवडणुकीवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करणाऱ्या मनसेने विधानसभेची निवडणूक लढवली. पण विधानसभेत त्यांचा एकही उमेदवार विजयी झाला नाही.



कोविड काळात राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आणि प्रशासक नेमण्यात आले. पुढे आरक्षणाच्या मुद्यावर न्यायालयात खटले सुरू झाले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या. यामुळे स्थानिक पातळीवर निवडून आलेले असे मनसेचे प्रभावी लोकप्रतिनिधी उरलेले नाहीत. या परिस्थितीत मनसेची पुढची वाटचाल कशी असेल याचे उत्तर राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यातून मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



हिंदू - मुसलमान तणाव, औरंगजेबाच्या कबरीचा वाद, रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद, आरक्षण, मराठी - अमराठी, रोजगाराचे प्रश्न, महायुतीचा कारभार, प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मुंबईचा विकास, मुंबई महापालिकेची निवडणूक आदी विषयांवर राज ठाकरे काय बोलणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. राज ठाकरे कोणावर टीका करणार आणि कोणाचे कौतुक करणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.



मनसेने गुढी पाडव्याच्या मेळाव्यासाठी जय्यत तयारी केली आहे. मुंबईत दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर मोठे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. मैदानावर मोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. पाण्याचे टँकर, पाण्याच्या बाटल्या, मोबाईल टॉयलेट, रुग्णवाहिका, अग्निशमनाची व्यवस्था आणि आपत्काळासाठी अग्निशमन दलाची बंब गाडी, खबरदारीचा उपाय म्हणून जवळच्या शुश्रूषा आणि हिंदुजा रुग्णालयात निवडक खाटा आरक्षित ठेवल्या आहेत.
Comments
Add Comment