मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ज्या क्रूर पद्धतीने दिशा सालियन हिला मारण्यात आले, हे अत्यंत घाणेरडे कृत्य आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना केली.
मुंबईत प्रदेश भाजपा कार्यालयात खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. दिशा सालीयन प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी आपणाला दोन फोन केले, असा आरोप राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केल्याबद्दल पत्रकारांनी विचारणा केली असता नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी फोन केले हे खरंच आहे. नितेश राणे काहीही चुकीचे बोललेले नाहीत. याची आठवण सांगताना ते म्हणाले की, त्यावेळी मी मुंबईतून जुहू येथील माझ्या घरी जाण्यासाठी निघालो असताना वाटेत माझा मोबाईल खणखणला. तो उचलला, तेव्हा समोरून उद्धव ठाकरे यांचे त्यावेळचे पीए मिलिंद नार्वेकर हे फोनवर होते. मिलिंद नार्वेकर यांनी साहेबांना बोलायचे आहे असे मला सांगितले. तेव्हा मी कोण साहेब, असे विचारले असता उद्धव ठाकरे हे स्वतः मिलिंद नार्वेकर यांच्या फोनवर आले तेव्हा मी ‘जय महाराष्ट्र’ केले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुम्ही अजूनही ‘जय महाराष्ट्र’ बोलता असा मला प्रती प्रश्न केला. तेव्हा मी त्यांना ‘जय महाराष्ट्र’ ही महाराष्ट्राची प्रॉपर्टी आहे, छत्रपती शिवाजी महाराज यांची ती प्रॉपर्टी आहे असे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिशा सालीयन प्रकरणात जे काही सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही प्रसार माध्यमांशी बोलताना माझ्या मुलाचा उल्लेख करू नका अशी विनंती त्यांनी केली व सहकार्य करा असेही सांगितले. त्यावर नारायण राणे यांनी मी या प्रकरणात कोणाचेही नाव घेतलेले नाही, तुम्ही आता ज्याचे नाव घेतलेत, त्याचेही नाव मी घेतलेले नाही. यामध्ये महाराष्ट्राच्या एका तत्कालीन मंत्र्याचे नाव पुढे येत आहे. मी ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच त्याच्या संध्याकाळच्या कार्यक्रमांना आवर घाला, त्याच्याकडे लक्ष द्या असेही त्यांना सुचवले असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर माझ्या कणकवली येथील हॉस्पिटलच्या परवानगी प्रकरणात मी त्यांना फोन केला होता. त्यावेळी ही उद्धव ठाकरे यांनी दिशा सालीयन प्रकरणात त्यांच्या चिरंजीवांचे नाव न घेण्याबाबत मला सुचवले. त्यावेळीही त्यांना मी पूर्वीसारखेच उत्तर दिले, याची आठवण नारायण राणे यांनी याबाबत करून दिली.
त्यानंतर पत्रकारांनी भाजपा आमदार चित्रा वाघ आणि शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्यातील वादा बाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की अनिल परब आणि आक्रमकता याचा काय संबंध आहे? ते वकील असल्यामुळे फार तर खोटेनाटे बोलू शकतात याच्यावर ते आणखी काही करू शकत नाही. आणि त्याच प्रमाणे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की चित्रा वाघ एकट्या नाहीत तर त्यांच्या पाठीशी भाजपा उभा आहे आणि स्वतः मी नारायण राणे हा देखील चित्र वाघ यांच्या पाठीशी उभा आहे. परब जिथे सांगतील तिथे येण्याची माझी तयारी आहे, असे आव्हानही नारायण राणे यांनी यावेळी अनिल परब यांना दिले.
दिशा सालीयन मृत्यू प्रकरणात अधिक बोलताना ते म्हणाले की त्या निरपराध मुलीचे वडील सतीश सालियन व त्यांच्या कुटुंबावर त्यावेळेला मोठा दबाव होता. किशोरी पेडणेकर या त्यांच्या घरी का जात होत्या ? कोणाच्या सांगण्यावरून जात होत्या?? असे प्रश्न विचारून राणे म्हणाले की त्या वेळेला पोलीस यंत्रणा, राज्यातली आरोग्य यंत्रणा कोणीही त्यांना मदत करत नव्हते. ॲम्बुलन्स देखील बदलली गेली असे सांगून आता तिच्या वडिलांना त्यांच्यावरचा दबाव कमी झाल्यासारखे वाटले आणि त्यामुळे त्या मुलीचे वडील कोर्टात गेले आहेत असेही ते म्हणाले. मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी सचिन वाजे हा या प्रकरणातील सर्व कर्ता करविता आहे असा आरोपही त्यांनी केला आणि सचिन वाजेला जर बोलता केला तर सर्वच सत्य बाहेर पडेल असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मी केलेल्या एका भूतकाळातील विधानावर तत्कालीन पोलिसांनी मला अटक करण्यासाठी कुठे कुठे शोधले? नाशिक? दिंडोशी? आणि अखेरीस मला भरल्या ताटावरून उठवून अटक केली अशी खंत व्यक्त करतानाच आता तर एका निरपराध मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप तिचे वडीलच करत आहेत आणि तिची हत्या झाल्याचेही सांगत आहेत. मग आता पोलिस कारवाई का करत नाहीत असा सवाल त्यांनी विचारला. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे आणि ज्यांच्यावर संशय आहे त्या आरोपींना तातडीने अटक केली पाहिजे जर पोलीस कारवाई करत नसतील आणि संबंधितांना मदत करत असतील तर अशा पोलिसांना देखील तात्काळ निलंबित केले पाहिजे त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असा इशाराही त्यांनी दिला. मी राज्याचा मुख्यमंत्री झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी एकाच वेळी ३७ पोलिस अधिकाऱ्यांना एका प्रकरणात तडकाफडकी निलंबित केले होते याची आठवणही त्यांनी पत्रकारांना करून दिली.
उबाठाचे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे म्हणाले की एका महिन्यात किती चित्र बदलले? मुलाला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे किती फेऱ्या मारल्या?? पण आता कितीही फेऱ्या मारा यात कोणीही वाचणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले.
नागपूर दंगल प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागत आहे याबाबत विचारणा केली असता नारायण राणे म्हणाले की सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी येऊन किती दिवस झाले? त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचे पत्र देऊन अद्याप त्या पत्राची शाही देखील पुसली गेलेली नाही त्यामुळे कशाला एवढे बोलतो?? शांत बस ना अशा शब्दात नारायण राणे यांनी त्यांना फटकारले.
दिशा सालीयन प्रकरणात आदित्य ठाकरे सर्व आरोप नाकारत आहेत याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता नारायण राणे म्हणाले की तो खोटे बोलत आहे .आत्तापर्यंत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावामुळे वाचत आले पण आता तर चालूही शकत नाहीत अशी स्थिती आहे आणि आता तर तुरुंगातच जायचे आहे. त्या दिवशी आदित्यला लोकांनी हा पॅन्ट मध्ये बघितले आहे, अशा शब्दांत त्यांनी आदित्य ठाकरे यांचाही समाचार घेतला.
सुशांत रजपूत हत्येचा पीए सावंत साक्षीदार
सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत रजपूत याचा सावंत नावाचा पीए असून तो सावंतवाडीचा आहे असे सांगत नारायण राणे म्हणाले की ज्या दिवशी सुशांत रजपूत ची हत्या झाली त्याचे मोबाईलवर रेकॉर्डिंग या सावंतने केले आहे त्यामध्ये त्याच्या गळ्याभोवती फास आवळून त्याला मारण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
पत्रकारितेचे पावित्र्य जपा
यावेळी खासदार नारायण राणे यांनी पत्रकारांनाही भावनिक आवाहन केले. तुमच्यासमोर जर एका निरापराध मुलीची अशाप्रकारे क्रूर आणि निर्घृण हत्या होत असेल तर पत्रकारांनी पत्रकारितेच्या धर्माला जागावे पत्रकारितेचे पावित्र्य टिकवावे आणि या प्रकरणात आणखीन काय काय करता येईल की ज्यायोगे जे या प्रकरणात दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल. याबाबत पत्रकारानी सतीश सालियन यांना मदत करावी असे भावनिक आवाहनही खासदार नारायण राणे यांनी यावेळी उपस्थिताना केले.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…