Friday, May 9, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीसिंधुदुर्ग

Nilesh Rane : महायुतीच्या वतीने कुडाळमध्ये शिमगोत्सवाचे आयोजन

Nilesh Rane : महायुतीच्या वतीने कुडाळमध्ये शिमगोत्सवाचे आयोजन

आमदार निलेश राणे यांची संकल्पना


सिंधुदुर्ग : आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने कुडाळ येथे "शिमगोत्सव २०२५" कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार २९ मार्च रोजी सायं. ६ वाजता येथील तहसीलदार कार्यालय नजीकच्या क्रीडासंकुल मैदानावर रोंबाट व राधा नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर रविवार ३० मार्च रोजी सायं. ६ वाजता गुढीपाडव्या निमित्त शहरात नववर्ष स्वागतपर शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्गासह जिल्ह्याबाहेरील चित्ररथ देखावे सहभागी होणार आहे, अशी माहीती महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत दिली.


कुडाळ एमआयडीसी येथील शासकीय विश्रामगृह येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. कुडाळकर बोलत होते. यावेळी जि. प. चे माजी अध्यक्ष संजय पडते, शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख योगेश तुळसकर व अरविंद करलकर, भाजप तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.



श्री.कुडाळकर म्हणाले, काही वर्षांपूर्वी शिमगोत्सव ही संकल्पना आपण मांडली होती. सुरूवातीला या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. होळीही मोठ्या दिमाखात साजरी करण्यात आली. यावर्षीही कुडाळ येथे शिमगोत्सव कार्यक्रम घेण्याची संकल्पना स्थानिक आमदार निलेश राणे यांच्या समोर मांडल्यानंतर त्यांनी सकारात्मकता दर्शवित महायुतीच्या बॅनरखाली भरगच्च कार्यक्रम घेण्याचे त्यांनी आश्वासित केले. त्यांनी या कार्यक्रमाला सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.


कोकणात शिमगोत्सवात रोंबाट, राधानृत्य, सोंगे आदी पारंपारिक लोककला प्रकार ग्रामीण भागात पाहावयास मिळते. ही लोककला शहरवासियांना पाहता यावी, या लोककलेचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच या लोककलेला राजाश्रय मिळावा, हा आमचा या स्पर्धेमागील हेतू आहे. शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ६ वाजता येथील तहसीलदार कार्यालय नजिकच्या मैदानावर शिमगोत्सव कार्यक्रम अंतर्गत रोंबाट व राधा नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चलचित्रे, चित्ररथ देखाव्यांचेही सादरीकरण करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या रक्कमेची बक्षिसेही देण्यात येणार आहेत. तसेच चित्ररथ देखावे संघ आणि सर्व सहभागी संघांना उचित मानधनही देण्यात येणार आहे.


या कार्यक्रम प्रसंगी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, आ.दीपक केसरकर, आ. निलेश राणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, महायुतीतील नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रविवार दि. ३० रोजी सायंकाळी ६ वाजता गुढीपाडव्या निमित्त कुडाळ शहरात नववर्ष स्वागत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्गासह गोवा व अन्य भागातील चलचित्रे, चित्ररथ देखावे सहभागी होणार आहेत, असे श्री.कुडाळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment