मुंबई : पालघर (Palghar) जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील चार हजार मजूर थकीत मजूरीची रक्कम मिळावी म्हणून तहसिल कार्यालयासमोर मंगळवारी सकाळपासून थांबून असल्याचा मुद्दा सभागृहात उपस्थित होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत मजूरांना त्यांची ४५ कोटींची थकबाकी होळी सणापूर्वी तात्काळ वितरीत करण्यात येईल, अशी घोषणा केली.वसई-विरार मतदारसंघाच्या आमदार स्नेहा दुबे (Senha dube) यांनी पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील चार हजार मजूरांना त्यांची मजूरी मिळाली नसल्याचे आणि त्यासाठी ते संबंधित तहसिल कार्यालयांसमोर सकाळपासून जमले असल्याची माहिती सभागृहाला दिली. या मजूरांना थकीत मजूरीची रक्कम तात्काळ मिळावी, ही मागणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे त्यांनी केली होती.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा मुद्दा अत्यंत संवेदनशीलतेने घेऊन संबंधीत मजूरांसाठी ४५ कोटी रुपये तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश दिले. रोजगार हमी विभागाला २२० कोटी रुपये नुकतेच वितरीत करण्यात आले असून त्यातून ही रक्कम तात्काळ दिली जाईल. त्यामुळे संबंधित मजूरांना होळी आनंदात साजरी करण्यात अडचण येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.