मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेकडे लक्ष
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान राज्याच्या विधानसभेत अनेक मुद्द्यांवरून चर्चासत्रा दरम्यान नेत्यांमध्ये शाब्दिक खटकेही उडताना दिसत आहेत. यात आता आणखी एका वादंगाने भर घातली असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) आणि लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्या नवा संघर्ष आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शीळ-तळोजा मार्गालगतची १४ गावे नवी मुंबई महापालिका (New Mumbai) हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना याबाबतचं पत्र पाठवण्यात आलं असून, यामध्ये शीळ तळोजामधील १४ गावे नवी मुंबई पालिकेत नको स्पष्ट लिहिण्यात आले आहे. याच कारणामुळे आता ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा नाईक विरुद्ध शिंदे असा संघर्ष डोके वर काढताना दिसत आहे.
नवी मुंबई महापालिकेत (New Mumbai) शीळ तळोजालगत असणारी १४ गावे समाविष्ट करुन घेण्यास गणेश नाईक यांचा विरोध कायम असून, यामागे काही कारणं पुढे करण्यात येत असल्याचे म्हटले जात आहे. ही गावे शीळ- तळोजा रस्त्यालगत असून, ती कल्याणच्या हद्दीत आहेत. ज्यामुळे नवी मुंबईला जोडण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या शक्य नसून या गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्यास सहा हजार कोटींचा निधी लागणार आहे.
याचा भार नवी मुंबईच्या (New Mumbai) जनतेला बसणार असल्याची बाब पुढे केली. या गावांमध्ये अनधिकृत भंगार वाले आहेत, यामुळे गणेश नाईक यांनी या गावांना जोडण्यास विरोध केला होता. वरील गावे नवी मुंबईत समाविष्ट करायची असल्यास शासनाने निधी द्यावा, तसेच या चौदा गावांना जोडणारा एक बोगदा बांधून द्यावा, याशिवाय अनधिकृत भंगारवाल्यांना इथून बाहेरचा रस्ता दाखवत ती जागा महापालिकेच्या हाती द्यावी अशा काही मागण्या गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीआधी केल्या होत्या. या मागण्या आजही कायम असून, त्यांनी याच संदर्भातील पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यामुळे आता सीएम फडणवीसांच्या भूमिकेवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.