जिल्ह्यासाठी १ कोटी १४ लाखांचे अनुदान मंजूर
अलिबाग : गेले अनेक महिने अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना ज्या अनुदानाची प्रतीक्षा होती ते अनुदान आता मंजूर झाले आहे. लाडकी बहीण योजनेसाठी केलेल्या कामाचे पैसे आता त्यांना मिळणार आहेत. यासाठी रायगड जिल्ह्याकरता १ कोटी १४ लाख ८३ हजार ९०० इतके अनुदान मंजूर झाल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहिता ओव्हाळ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यात महिला व बालविकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना १ जुलै २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत पात्र महिलांचे अर्ज नारीशक्ती दूत अॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टलवरून भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना देण्यात आली होती. यानुसार रायगड जिल्ह्यासाठी आयुक्त, महिला व बालविकास, पुणे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना एकूण १ कोटी १४ लाख ८३ हजार रुपयांचे प्रोत्साहन भत्त्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
अंगणवाडी सेविका यांनी नारीशक्ती दूत अॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टलवर यशस्वीपणे नोंदवलेल्या २ लाख २९ हजार १८४ अर्जावर आधारित ५० रुपये प्रति अर्ज याप्रमाणे १ कोटी १४ लाख ५९ हजार २०० रुपये, तर मुख्य सेविकांनी नोंदवलेल्या ४९४ अर्जावर आधारित ५० रुपये प्रति अर्जाप्रमाणे २४ हजार ७०० अनुदान मंजूर करण्यात आले आहे. हे अनुदान तालुकानिहाय बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या डीडीओ खात्यावर वर्ग करण्यात आले असून, जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांच्या खात्यावर हे भत्ते वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.