Wednesday, May 14, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजविधिमंडळ विशेषमहत्वाची बातमी

Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे तर आग्र्यात शिवरायांचे स्मारक

Maharashtra Budget 2025 : संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे तर आग्र्यात शिवरायांचे स्मारक

अर्थसंकल्पीय भाषणात मोठी घोषणा


मुंबई : महाराष्ट्राचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार आणि विधानपरिषदेत वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मांडला. यंदाच्या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीका करत सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा न दिल्याचा आरोप केला. मात्र, राज्य सरकारने या अर्थसंकल्पाद्वारे छत्रपती संभाजी महाराजांशी संबंधित एक मोठी घोषणा केली आहे.


संगमेश्वरातील सरदेसाईवाडा येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. हिंदी चित्रपट छावा प्रदर्शित झाल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान संपूर्ण देशभर पोहोचले.



अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण आणि विस्तार करण्यासाठी संभाजी महाराजांनी अतुलनीय धैर्याने संघर्ष केला. त्यांच्या पराक्रमाच्या खुणा ज्या ठिकाणी आहेत, त्यापैकी संगमेश्वर हे एक महत्त्वाचे स्थान आहे."


याच ठिकाणी संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विशाल सेनेशी हातावर मोजता येतील एवढ्या मावळ्यांसह लढा दिला होता. त्यांच्या पराक्रमाची आठवण जपण्यासाठी संगमेश्वर येथे भव्य स्मारक उभारले जाणार असल्याचे पवार यांनी सांगितले. या घोषणेनंतर सभागृहात "छत्रपती संभाजी महाराज की जय" आणि "हर हर महादेव" च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले.



तुळापूर आणि वढु बुद्रुक येथे स्मारक उभारणी प्रगतीपथावर


छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ तुळापूर आणि समाधीस्थळ वढु बुद्रुक येथे भव्य स्मारक उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच, दरवर्षी एका प्रेरणादायी गीताला "छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत" पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


हरियाणातील पानिपत येथेही स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मराठा वीरांच्या स्मृतीसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हरियाणा शासनाच्या मदतीने या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.



आग्र्यात शिवरायांचे स्मारक


अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान, अर्थमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासंदर्भात आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. शिवरायांच्या आग्रा येथील नजरकैदेतून सुटकेच्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ आग्र्यात भव्य स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



आंबेगावातील शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी


पुण्यातील आंबेगाव येथे चार टप्प्यांत भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारला जात आहे. यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने पार पडावे यासाठी राज्य शासनाने अतिरिक्त ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment