स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
ज्याप्रकारे (अमानुष मारहाणीचे) फोटो आले आहेत, ज्या प्रकारे (संतोष देशमुखांची) ही हत्या झाली आहे, या हत्येमागे ज्याला (वाल्मीक कराड) मास्टरमाईंड ठरविण्यात आले आहे, तो मंत्र्यांच्या इतका जवळचा आहे, तर मग त्या मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कठोर भूमिकेमुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा अखेर राजीनामा देणे भाग पडले.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी तपासासाठी सीआयडी नेमल्यावर सरकारने त्यांना पूर्ण मोकळीक दिली होती. न्यायालयात आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यात काय आहे हे मुख्यमंत्र्यांनाही ठाऊक नव्हते. फॉॅरेन्सिक लॅबमधून आरोपींच्या मोबाईलमधून डिलीट केलेली माहिती तपास यंत्रणांनी शोधून काढली. संतोष देशमुख यांच्या अमानुष मारहाणीचे जे फोटो समाज माध्यमातून व्हायरल झालेत तेसुद्धा पोलिसांनीच अथक प्रयत्नांनी शोधून काढले… स्वत: मुख्यमंत्र्यांनीच एका मुलाखतीत हे सांगितले.
तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच दि. ९ डिसेंबरला बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या झाली, तेव्हापासून धनंजय मुंडे व त्यांचे जिल्ह्यातील सहकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा सुद्धा फार उशिरा पोलिसांच्या हाती मिळाला. कृष्णा अंधळे तर तीन महिने झाले तरी अजून फरारीच आहे. तो जिवंत तरी आहे का, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. संतोष देशमुख हा गावातील लोकप्रिय सरपंच होता. दोन कोटींच्या खंडणी वसूल करण्याच्या कामात त्याचा अडथळा होत होता म्हणून वाल्मीक व त्याच्या टोळीने त्याचे अपहरण करून, त्याला निर्वस्त्र करून त्याचे हाल हाल करून ठार मारले. खंडणी वसूल करताना यापुढे कोणी आपल्याला आडवे जाण्याचे धाडस करू नये या हेतूने दहशत निर्माण करण्यासाठी संतोषची निर्घृण हत्या करण्यात आली. वाल्मीक हा या टोळीचा आका म्हणून ओळखला जात होता, तर या आकाचा आका म्हणून सरकारमध्ये मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंकडे बोट दाखवले गेले. संतोषच्या मारेकऱ्यांचे आश्रयदाते मंत्रिमंडळात बसले आहेत, असे उघड आरोप होत होते तरीही तब्बल ८० दिवस स्वत: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि धनंजय मुंडेही कशाची वाट पाहत होते? गेले तीन महिने भाजपाचे आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, नमीता मुंदडा, करुणा मुंडे, सुप्रिया सुळे, अंजली दमानीया, मनोज जरांगे असे अनेक दिग्गज संतोष देशमुखांच्या हत्येवरून माध्यमातून तोफा डागत होते. बीडमधील भयावह दहशतवादाच्या कहाण्या रोज प्रसिद्ध होत होत्या. बीड हत्या प्रकरणात जनमताचा आणि राजकीय दबाव रोज वाढत होता. पोलिसांच्या बदल्या झाल्या, नवे पोलीस प्रमुख आले, सीआयडी व एसआयटी नेमली गेली. माध्यमांचा व लोकप्रतिनिधींचा रोख आकाचा आका म्हणजे धनंजय यांच्यावर होता, पण मुंडे राजीनामा देत नव्हते. त्यांचे बॉस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्याकडे राजीनामा मागत नव्हते आणि स्वत: देवेंद्र फडणवीस हे अजितदादा काय करणार याची वाट पाहत होते. फडणवीस म्हणत होते, अजितदादा जी भूमिका घेतील ती मान्य आहे, मुंडे म्हणत होते – मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतील ते मला मान्य आहे आणि अजितदादा म्हणत होते – हत्या प्रकरणात मुंडेंचा संबंध आहे असे कोणतेही पुरावे पुढे आलेले नाहीत… जर पुरावे नाहीत, न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातही त्यांचे नाव नाही मग मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनामा द्यायला का सांगितले? अति तिथे माती असा प्रकार मुंडे यांच्याबाबतीत घडला असेच म्हणावे लागेल.
मुंडे हे मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी संतोष देशमुखच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल होण्याची वाट पाहत होते का? मुंडे यांना अजितदादांची सावली असे म्हटले जाते, या सावलीला वाचविण्यासाठी शेवटपर्यंत आटापिटा चालू होता, असेच चित्र महाराष्ट्राला दिसले. दि. ९ डिसेंबरला सरपंचाची हत्या झाली आणि ४ मार्चला मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हा वेळकाढूपणा होता की त्यांना वाचविण्याचा प्रयत्न झाला? महायुतीच्या सरकारमधील एका कॅबिनेट मंत्र्याला चार महिन्यांत राजीनामा देण्याची पाळी येते हे मुख्यमंत्र्यांनाही वेदनादायी नाही का? न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यावर मुंडे यांना सरकारमधील कोणीही वाचवू शकले नाही. गुन्हेगारांचा आश्रयदाता अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. तुम्ही राजीनामा देणार नसाल, तर मला राज्यपालांना पत्र पाठवून तुम्हाला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशारा देण्याची पाळी मुख्यमंत्र्यांवर का आली?संतोष देशमुख याच्या हत्येनंतर जसे वातावरण तापू लागले तसे मुंडे व त्यांच्या टोळीचे काळे कारनामे उघडकीस येऊ लागले. मित्रपक्षांना बरोबर घेऊन सरकार चालवणे कसे अडचणीचे आहे, याचा अनुभव देवेंद्र फडणवीसांना येऊ लागला. विधानसभेत सरकारला प्रचंड बहुमत आहे. २८८ पैकी २३५ आमदार महायुतीचे आहेत. भाजपाचे १३७ आमदार निवडून आले आहेत. पण काही मंत्र्यांच्या पराक्रमांमुळे सरकारची सतत बदनामी होते आहे, या सर्वांना सांभाळून, समतोल राखत आणि विरोधी पक्षांना अंगावर घेत देवेंद्र फडणवीस महायुती सरकारचा गाडा रेटत आहेत.
भाजपाचे दिवंगत नेते व ज्यांनी पक्षाची पाळेमुळे राज्यात रोवली ते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणातील गुन्हेगारीच्या विरोधात सातत्याने आवाज उठवला व त्यांच्या पुतण्याला याच आरोपाखाली मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला यापेक्षा दुर्दैव काय असू शकते? आपले चुलते गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून धनंजय यांनी राजकारणात प्रवेश केला. भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यावर त्यांच्या मतदारसंघातून त्यांनी पंकजाला भाजपाची उमेदवारी दिली तेव्हापासून धनंजय काकांवर नाराज झाले. पंकजा दोन वेळा परळीतून आमदार झाल्या. गोपीनाथ मुंडेंची राजकीय वारस म्हणून पंकजा पुढे आल्यावर धनंजय यांनी २०१४ मध्ये थेट राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरला. २०१९ मध्ये त्यांनी पंकजा यांचा पराभव केला व राष्ट्रवादीचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. महाआघाडी सरकारमध्ये सामाजिक न्यायमंत्री झाले तेव्हापासून त्यांचे बीडमधील साम्राज्य वाढू लागले. जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रसमध्ये झालेल्या बंडखोरीत ते अजितदादांबरोबर गेले आणि महायुती सरकारमध्ये कृषिमंत्री झाले.
२०२४ मध्ये पंकजा यांनी भाजपाच्या उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली पण पंकजा यांचा पराभव झाला. पंकजा विधान परिषदेवर आमदार झाल्या. धनंजय परळीतून २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा आमदार झाले व फडणवीस यांच्या सरकारमध्ये अन्न नागरीपुरवठा मंत्री झाले. धनंजय हे जबर महत्त्वाकांक्षी आहेत. अजितदादांचे विश्वासू आहेत. देवेंद्र-अजितदादा यांच्या गाजलेल्या पहाटेच्या शपथविधीच्या वेळी ते दादांबरोबर होते. बीड जिल्ह्यावर एकहाती वर्चस्व निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. वाल्मीकच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात दरारा निर्माण केला. दहशतीच्या जोरावर वाल्मीक आपले साम्राज्य विस्तारत होता. पालकमंत्री म्हणून धनंजय यांची कवच कुंडले वाल्मीकवर होती. वाल्मीकसमोर जिल्ह्यातील पोलीस-प्रशासन वाकत होते. जे आड येतील त्यांना कायमचा धडा शिकवला जात होता, त्यातूनच संतोष देशमुखची निर्घृण हत्या झाली.
कोणत्याही जिल्ह्यातील पोलीस – प्रशासन हे पालकमंत्री किंवा स्थानिक आमदाराच्या विरोधात कधी जात नाहीत. त्याचा पुरेपूर लाभ धनंजय यांच्या सहकाऱ्यांनी उठवला. गेले तीन महिने धनंजय यांच्या विरोधात राज्यभर प्रक्षोभ प्रकट होत असताना पंकजा स्वत: शांत होत्या. मात्र धनंजय यांनी राजीनामा दिल्यावर, देर आए, दुरुस्त आए, असे त्या म्हणाल्या. पंकजा यांनी बीडमधील एका कार्यक्रमात म्हटले होते – धनंजय यांचे पान ज्याच्याशिवाय हलत नाही, तो म्हणजे वाल्मीक कराड. त्यावर गर्दीतून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला होता. मग बीडमधील आकाला अटक झाल्यावरच मोठ्या आकाने लगेचच मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. संतोष हा मराठा, तर धनंजय हे वंजारी. मराठा विरुद्ध ओबीसी असाही संघर्ष पेटविण्याचा काहींनी प्रयत्न केला पण सत्तेच्या जोरावर दहशत आणि दहशतीच्या जोरावर सत्ता प्राप्त करणाऱ्यांना देवाभाऊंचा बडगा महागात पडला. मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांना कोणाचीही सहानुभूती मिळाली नाही. त्यांच्या समर्थनार्थ बीडमधेही कोणीही रस्त्यावर उतरले नाहीत. धनंजय मुंडे व नैतिकता यांचा संबंध काय, असा प्रश्न तर विचारला गेलाच, पण त्यांचे बॉस अजितदादाही त्यांना वाचवू शकले नाहीत.