मराठी माणूस नाही, तर हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूंनी मनामनात आजही छत्रपती शिवाजी महाराज हे शब्द उच्चारले तरी, रक्त सळसळते. औरंगजेबाच्या जुलमी साम्राज्याविरुद्ध रयतेचे ‘स्वराज्य’ निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या भूमीत साडेतीनशे वर्षांनंतर तोच नितांत आदर आजही कायम आहे. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावर आक्रमण करून आलेल्या औरंगजेबाचा पुळका आजही काही लोकांना येतो आहे, याचे आश्चर्य वाटते. छावा चित्रपटामुळे औरंगजेबाची क्रूरता पुन्हा एकदा नव्या पिढीला दिसली. छत्रपती संभाजी महाराजांना फसवून बंदी बनवून ४० दिवस ठेवले आणि त्यांचे हाल हाल करून त्यांना मारले, पण संभाजी महाराजांनी मृत्यूला कवटाळताना ना हिंदू धर्माचा त्याग केला ना त्याला शरण आले. गवताला भाले फुटतात, तसे लाखो मुगल सैनिकांविरुद्ध मराठा मावळ्यांनी २७ वर्षे संघर्ष केला; परंतु मराठा साम्राज्यांचा भगवा झेडा कायम फडकत ठेवला. त्यामुळे आज मराठी मातीत जन्माला आलेल्या मुलाला त्याचे आई-वडील छत्रपती शिवाजी महाराज हेच आपले दैवत आहेत, असे संस्कार देतात. महाराष्ट्र सरकारच्या स्थापनेपासून सर्व राजकारण्यांना शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा कित्ता गिरविल्याशिवाय त्यांना मान मिळणार नाही, याची कल्पना आली आहे. असे असताना, समाजवादी पार्टीचे ज्येष्ठ आमदार अबू असीम आझमी यांना औरंगजेबाचा इतका पुळका कशासाठी आला हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहणार नाही. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, आमदार आझमी यांनी औरंगजेबाबद्दल व्यक्त केलेल्या प्रेमाचा निषेध सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मंडळींकडून केला जात आहे ही जमेची बाजू असली तरी, आझमी यांना प्रवाहाच्या विरोधात जाऊन औरंगजेबाला हिरो ठरविण्याचा केलेला खटाटोप कशासाठी केला असेल याची उत्तरे त्यांनीच दिलेली बरी.
आता या आझमीने काय मुक्ताफळे उधळली ते पाहू. म्हणे, ‘औरंगजेब हा क्रूर नव्हता, तर उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात आहे.’ असे आझमीने माध्यमांसमोर सांगितले. एवढेच नव्हे, तर समाजवादी पार्टीच्या प्रवक्त्यांकडून औरंगजेब यांच्या राजवटीत भारताची सीमा ही अफगाणिस्तान आणि बर्मा देशापर्यंत पोहोचली होती.त्याच्या काळात भारताला सोने की चिडीयाँ म्हणायचे, अशी बाजू मांडण्याचा प्रयत्न माध्यमातून केला. याचा अर्थ ही केवळ एकट्या आझमीची भूमिका नाही, तर एका विशिष्ट विचारधारेवर चालणाऱ्या पक्षाची भूमिका असेल, तर फारच गंभीर आहे. ज्याने संभाजीराजांना हाल करून मारले, हिंदूंची मंदिरे तोडली असा औरंगजेब हा चांगला शासक कसा असू शकतो? असा सवाल आता शिवप्रेमी विचारत आहेत.
औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या आझमीसारख्या महाराष्ट्र द्रोह्यांनी, औरंगजेबांचे निर्दयी रूप पुन्हा एकदा अभ्यासावे. मुघल सत्ता प्राप्त करण्यासाठी औरंगजेबाने स्वत:च्या सख्ख्या भावांची हत्या केली होती. वडील शाहजहानला कैदेत ठेवले होते. आपला मुलगा आपल्याला धोकादायक ठरू शकतो, हे लक्षात आल्यानंतर औरंगजेबाने त्यालाही सोडले नाही. दारा शिकोहला हटवून स्वतः सत्ता हस्तगत केली. दारासह कुटुंबातील २७ जणांची हत्या करणारा औरंगजेब जर यांना क्रुरकर्मा दिसत नसेल, तर आझमीचे डोळे तपासून घ्यायला हवेत. खरे तर, अबू आझमीसारख्या माणसाकडून चांगले बोलण्याची काय अपेक्षा करणार. मुंबईत १९९३ साली बाॅम्बस्फोट मालिकेत हजारो निरपराध नागरिकांना जीव गमावावा लागला होता. मुगलाचा वारसा सांगणाऱ्या पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता, हे कोर्टाच्या रेकॉर्डवर आहे. त्या बॉम्बस्फोट मालिकेतील एक संशयित आरोपी म्हणून आझमीचे नाव होते. पुराव्याअभावी तो सुटला तरी, त्याचे अशा समाजविघातक प्रवृत्तीशी संबंध होते, ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे आझमीने अकलेचे तारे तोडले. त्याला जमिनीवर आणण्याची गरज आहे.म्हणे औरंगजेबाने त्याच्या ४९ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मुघल साम्राज्याच्या सीमांचा विस्तार केला. त्याने हिंदू-मुस्लीम असा भेद कधीच केला नाही, असे आझमीचे म्हणणे आहे. इतिहासात हजारो हिंदू मंदिरे नष्ट केल्याचे पुरावे सापडतील; परंतु औरंगजेबाने एक तरी मशीद पाडल्याचा पुरावा दाखवावा, असे आझमीला सांगावे लागेल. आता झाले ते पुरे झाले. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या कोणाचीही गय करता कामा नये. एवढेच नव्हे, तर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमीसारख्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनाही केली आहे, तर त्यावर त्वरित सरकारने कारवाई केली पाहिजे.
औरंगजेब म्हणजे क्रुरकर्माच होताच. तरीही महाराष्ट्रात अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी आल्या कुठून, हा प्रश्न आहे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात यापुढे कोणी करता कामा नये यासाठी आझमीविरोधात सरकारने ठोस कारवाई करायला हवी. महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या मनात बिंबलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला तडा देण्याचा प्रयत्न औरंगीवृत्ती करत असेल, तर त्याला वेळीच ठेचण्याचे काम केले पाहिजे. नाही तर महाराष्ट्राचे अस्वस्थ मन जुलमी मुघलांच्या पिळावलीला मातीत गाडण्यासाठी पुन्हा संघर्षाच्या पावित्र्यात जाईल. ती वेळ राज्यकर्त्यांनी आणू नये. उद्या दुसरा कोणीही आझमी तोंड वर करून बोलण्याची हिंमत करणार नाही, याची काळजी सरकारने घ्यावी.