Wednesday, March 19, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यस्वयंपाक घरातील भांड्यांच्या वापरा मागचे विज्ञान

स्वयंपाक घरातील भांड्यांच्या वापरा मागचे विज्ञान

रंजना मंत्री : मुंबई ग्राहक पंचायत

भारतात २८ फेब्रुवारी हा दिवस शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमन यांच्या सन्मानार्थ, वैज्ञानिकांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याच्या उद्देशाने ‘विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. वैज्ञानिकांनी लावलेल्या विविध कल्याणकारी शोधामुळे दैनंदिन जीवनात अनेक गोष्टीं उपलब्ध झाल्या आणि मानवी जीवन सुखकर झाले. भांड्यांचा शोध हा एक असाच शोध आहे ज्यामुळे गृहिणींना स्वयंपाक घरात अन्न शिजवताना त्याचा उपयोग होतो. 
विज्ञानम् जनहिताय’ या दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनेलवर विज्ञान मालिका सादर झाली होती. त्यातील एका भागात सादर झालेल्या स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्याच्या माहितीवर आधारित माहिती या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. आजच्या घडीला विविध धातूपासून बनवलेली, विविध प्रकारची भांडी बाजारात मिळतात. गृहिणी हौसेने ती भांडी विकत घेतात; परंतु यापैकी कोणत्या भांड्याचा वापर कसा करावा हे नीट जाणून घेणे फार गरजेचे आहे. कारण त्याचा  परिणाम थेट आपल्या आरोग्यावर होत असतो.मुख्यत्वेकरून स्वयंपाक करण्यासाठी स्टेनलेस स्टील, लोखंड, पितळ या धातूची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. स्टेनलेस स्टील म्हणजे लोह, क्रोमियम, निकेल, कार्बन यांचं संमिश्र. या सर्व धातूंच्या गुणधर्मामुळे ही भांडी  वापरायला सोयीस्कर असतात. याच मिश्रणाच्या आधारावर त्याचा पातळ, जाड असा दर्जा ठरत असतो. ब्रॅन्डेड भांड्यावर दिलेला कोड किंवा ग्रेड पाहून त्याचा दर्जा ओळखता येतो.
लोखंडाच्या भांड्यात स्वयंपाक करणं हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असते. निसर्गात लोहाचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने लोखंडाची भांडी फार महागही नसतात. अन्न शिजताना भांड्यातील लोह, पदार्थात उतरून शरीराला लोह मिळू शकत; परंतु पदार्थ भांड्यातच राहू दिला, तर त्याचा  रंग व चव बदलते. रासायनिक प्रक्रियेमुळे जास्त प्रमाणात क्षार पदार्थात शोषले जातात. त्यामुळे तयार झालेला पदार्थ लगेच दुसऱ्या भांड्यात काढावा. मध्यंतरीच्या काळात अतिशय वाजवी दरात मिळणारी ॲल्युमिनीयमची भांडी किंवा ॲल्युमिनीयम व मॅग्नेशियम पासून बनलेली हिंडालियमची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जात. या भांड्यात पदार्थ बनवताना उष्णता सम प्रमाणात पसरते, पदार्थ लवकर शिजतो व स्वच्छ करायला सोप्पे पडते. यामुळे ती लोकप्रिय झाली होती. नंतर मात्र  लक्षात आले की, या भांड्यात अन्न शिजवताना पदार्थात ॲल्युमिनीयमचा अंश उतरतो जो आरोग्याला हानिकारक ठरतो. त्यामुळे अशी भांडी वापरणे शक्य तोवर टाळावे. असे असले तरी ॲल्युमिनीयमचा कूकर मात्र त्यात स्टीलची भांडी ठेऊन वापरण्यास हरकत नाही. ही भांडी ठेऊन कुकर वापरत असताना तळाला जाळीची एक तबकडी असते ती अवश्य ठेवावी. कुकरमधील पाणी उकळायला लागल्यावर त्याचा एक मोठा बुडबुडा तयार होतो. आतील दाबामुळे त्यामध्ये प्रचंड शक्ती असते. जाळीच्या तबकडीमुळे एका मोठ्या बुडबुड्या ऐवजी छोटे-छोटे अनेक बुडबुडे तयार होतात. त्यामुळे भांडी स्थिर राहून मोठ्या बुडबुड्यामुळे निर्माण होणारा धोकाही टळतो. तसेच कुकरमध्ये पदार्थ शिजवताना शिट्टी होऊ देणे ही एक चुकीची समजूत आहे. शिट्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाफ पर्यायाने इंधन वाया जाते. कुकरमध्ये निर्माण होणाऱ्या वाफेवरच आतला पदार्थ शिजत असतो. कुकरची शिट्टी ही केवळ अपघात रोखण्यासाठी योजलेली रचना असते.
सध्या बाजारात आलेली थ्रीप्लाय भांडी दिसायला सुंदर, वापरण्यास सोयीची व आरोग्याच्या दृष्टीने  सुरक्षित आहेत. वर/ खाली स्टील व मध्ये ॲल्युमिनियम अशा तीन थरांनी बनवलेल्या या भांड्यात उष्णता समप्रमाणात पसरणे, पदार्थ तळाला न चिकटणे हे गुणधर्म असतात. याची किंमत मात्र  स्टीलच्या भांड्यापेक्षा जास्त असते. तांब व जस्त यापासून तयार केलेली  पितळेची भांडी वापरण्यास उत्तम असतात. मात्र या धातूवरही अपायकारक रासायनिक अभिक्रिया होऊ शकते म्हणून प्रत्येक वेळी भांड्याना कल्हई करण्यासाठी त्यावर आतून  कथिल धातूचा थर चढवावा लागतो. जो अतिशय महाग असतो. त्यातूनच पुढे निर्लेप म्हणजे टेफ्लॉन भांड्यांचा शोध लागला. ही भांडी कमी वेळात, कमी तेलात पदार्थ बनवण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित अशी भांडी आहेत. तरी ही भांडी वापरताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. रिकामे भांडे चालू गॅसवर खूप वेळ ठेवून दिल्याने किंवा पदार्थ बनवताना ३००C पेक्षा जास्त तापमान ठेवल्यास भांड्यावर जो फ्लुरोपॉलीमर रसायनाचा  थर चढवलेला असतो त्याचे विघटन होण्यास सुरुवात होते. यामुळे निर्माण झालेला, नजरेस पटकन दिसून न येणारा धूर हवेत मिसळून स्वयंपाक खोलीतील हवा प्रदूषित होते व तिथे वावरणाऱ्या गृहिणीच्या श्वसनावर परिणाम होऊ शकतो. तसेच या भांड्यांना चरे पडल्यास किंवा त्या वरील कोटिंग निघाल्यास, याचा वापर त्वरीत बंद करावा. कारण पदार्थावर रासायनिक क्रिया होऊन तोही अपायकारक ठरू शकतो. टेफ्लॉन भांड्यांचा शोध लागल्यापासून ती वापरण्यास जास्तीत जास्त सुरक्षित होण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. तरीही २०१३सालापासून उत्पादित झालेली भांडी ग्राहकांनी घेण्यास काही हरकत नाही.
ॲनोडाईज्ड म्हणजे मॅग्नेशियम व ॲल्युमिनीयम या मिश्रणातून बनवलेल्या भांड्यावर कोणतीही प्रक्रिया होत नाही व वापरण्यास सुरक्षित टेफ्लॉन व ॲनोडायज्ड भांडी सुरक्षित असली तरी २ ते ३  वर्षांनी ती बदलणे योग्य ठरते. कोणतीही प्रक्रिया होण्याचा संभव नसलेली सुरक्षित अशी काचेची भांडी संभाळून हाताळली तर ती फार काळ वापरली तरी चालतात. तांब्याच्या भांड्याचा खास करून पाणी ठेऊन पिण्यासाठी वापर केला जातो. बाजारात मिळत असलेल्या निमुळत्या आकाराची ही भांडी घेताना त्याच्या स्वच्छतेकडे मात्र लक्ष द्यावे. यांचा हवेशी संपर्क आला की, कार्बोनेट व हायड्रोक्साईड तयार होतात जे आरोग्याला हानीकरक ठरू शकतात. स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यामध्ये वैविध्य दिसून येत असले तरी आरोग्याच्या दृष्टीने नेमकी कोणती भांडी वापरावी हे आपण रहात असलेले भौगोलिक ठिकाण, कुटुंबातील सदस्यांची आवडनिवड, सवयी, आरोग्य, आर्थिक स्थिती या सर्वांवर अवलंबून असते. त्यामुळे याचा अचूक निर्णय एक सुजाण गृहिणी योग्य रितीने नक्कीच घेऊ शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -