पुणे : महाशिवरात्र बुधवारी असल्याने बाजारात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात राज्यातील गावरान रताळे प्रति किलो ३५-४० रुपये, तर कर्नाटक भागातील रताळ्यांना दर्जानुसार २० ते २२ रुपये भाव मिळत आहे. तसेच, किरकोळ बाजारात ५०-६० रुपये भाव मिळत आहे. महाशिवरात्रीनिमित्त मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पटहून अधिक आवक झाली आहे. तरीही भाव जास्त मिळत असल्याची माहिती अडतदार यांनी दिली. मार्केट यार्डात अडीच हजार पोती रताळ्याची आवक झाली. बेळगाव भागातूनही नगण्य आवक झाली. या रताळ्यांना किलोला २० ते २२ रुपये भाव मिळत आहे.
कराड, मलकापूर भागातून गावरान रताळे येत असतात. हे रताळे चवीला गोड, आकाराने लहान आणि दिसायाला आकर्षक असतात. त्यामुळे ग्राहकांकडून या रताळ्यांना जास्त मागणी असते. परिणामी यांना इतर रताळांच्या तुलनेत जास्त भाव मिळतो. कर्नाटकमधून आलेले रताळे आकाराने मोठी, तुरट असतात. त्यामुळे त्यांना गावरानच्या तुलनेत कमी भाव असतो. मात्र, मिळणाऱ्या भावाच्या तुलनेत वाहतूक खर्च परवडत नसल्याने आवक नगण्य होत आहे. पंढरपूर भागातील रताळे दिसायला थोडे पांढरे आणि कमी गोड असतात.