व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथोलिक चर्चचे प्रमुख पोप फ्रान्सिस यांना थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार झाला आहे. उपचारांसाठी पोप फ्रान्सिस यांना व्हॅटिकन सिटीतील जेमेली रुग्णालयात दाखल केले आहे.
जर्मनीत ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन आणि ख्रिश्चन सोशल युनियनच्या युतीचा विजय
पोप फ्रान्सिस यांना आधीपासूनच दुहेरी न्युमोनिया, सौम्य प्रमाणात मूत्रपिंड निकामी होणे आणि श्वसनाच्या विविध समस्यांनी ग्रासले आहे. आता त्यांना थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार झाला आहे. आजारी असलेले पोप फ्रान्सिस ८८ वर्षांचे आहेत.
अनेकदा ल्युकेमियासारख्या अस्थिमज्जा विकारांमुळे किंवा कमकुवत झालेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार होतो. काही वेळा औषधांच्या दुष्परिणामांमुळेही थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार होतो. सतत आजारी असणाऱ्या आणि गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. पोप फ्रान्सिस प्रदीर्घ काळापासून आजारी आहेत. यामुळे या आजारपणातूनच त्यांना थ्रोम्बोसाइटोपेनिया झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
थ्रोम्बोसाइटोपेनिया या आजाराची प्रमुख लक्षणे
- प्लेटलेट काउंट कमी होणे
- वारंवार नाकातून रक्त येणे
- हिरड्यांतून वारंवार रक्त येणे
- दुखापतीमुळे दीर्घकाळ रक्तस्त्राव होणे
- त्वचेवर लाल डाग
- अशक्तपणा
- थकवा
थ्रोम्बोसाइटोपेनिया या आजारावरील उपचार
सामान्यपणे प्लेटलेट काउंट प्रति मायक्रोलिटर रक्तात १५० हजार ते ४५० हजार प्लेटलेट्स एवढा असतो. थ्रोम्बोसाइटोपेनिया हा आजार झालेल्या रुग्णाचे प्लेटलेट काउंट सामान्य व्हावे यासाठी डॉक्टर प्राधान्याने उपचार करतात. औषधे, आराम आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेला आहार यांच्या मदतीने प्लेटलेट काउंट सामान्य करण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा बाहेरुन प्लेटलेट्स देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जातो. पण बाहेरुन दिलेले प्लेटलेट्स शरीराने स्वीकारले नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. याच कारणामुळे डॉक्टर बाहेरुन प्लेटलेट्स देण्याआधी इतर पर्याय तपासून बघतात.