मुंबई :अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली मुक्कामी आहेत. तथापि, मुंबईमध्ये मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा अपवाद वगळता संपूर्ण मंत्रालय ओस पडल्याचे वाटत होते. याबाबत मंत्री कार्यालयात विचारणा केली असता उत्तरे द्यायला मंत्र्यांच्या बहुतांश कार्यालयात उपस्थित असणारे मंत्रीमहोदय दिल्लीत असल्याचे सांगण्यात आले.
मंत्र्यांचा सर्व कर्मचारी वर्ग कुठे आहे विचारले तर काही मंत्र्यांच्या दालनांत उत्तर मिळेना, तर काही मंत्री दालनांत असतील ईकडेच कुठेतरी असे उत्तर मिळत होते. काही मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक काही अधिकाऱ्यांसमवेत गप्पांत रस घेताना आढळले. डिपार्टमेंटंची सचिव कार्यालये मात्र पूर्ण क्षमतेने काम करताना आढळली. पण बाकी मंत्रालयात आनंदी आनंदच होता.
या परिस्थितीला उपमुख्यमंत्री अजित पवारांचे कार्यालय व काही अंशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कार्यालय अपवाद ठरले होते. नित्यनियमाने येथे कार्यालयीन कर्मचारी पूर्ण शिस्तीने काम करताना आढळून आला. काही अभ्यागत व कार्यक्रमातील बैठका उरकून अजित पवार मंत्रालयातून रवाना झाले. तरीही त्यांच्या कार्यालयाची शिस्त जराही ढळल्याचे जाणवले नाही.
हीच शिस्त मुख्यमंत्री कार्यालयात दिसून आली. मुख्यमंत्री नसताना स्वीय सहाय्यकांपैकी प्रशासकीय अधिकारीपदासाठी सहकार्य करणारे खंदारे नावाचे अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत जनता दरबारचे काम पाहात होते. दरबारातील तक्रारदारांच्या तक्रारीचे नीटनीटके निवारण करण्याचा प्रयत्नही करत असताना दिसले.