मुंबई : कल्याण डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही. त्यांची बाजू कोर्टात नव्याने मांडण्यासाठी सरकारकडून वकिलांची टीम दिली जाईल आणि यावर मार्ग काढला जाईल, असे आश्वासन कल्याणचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गुरुवारी दिले. या इमारतींमधील रहिवाशांनी गुरुवारी खासदार डॉ. शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी खासदार शिंदे यांनी रहिवाशांच्या अडचणी समजून घेतल्या.
उच्च न्यायालयाने कल्याण डोंबिवलीतील ६५ अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला दिले आहेत. या ६५ इमारतींमधील ६५०० कुटुंबांवर बेघर होण्याची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर या इमारतींमधील रहिवाशांनी खासदार डॉ. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, ६५ इमारती तोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या इमारतींमधील रहिवाशांनी जेव्हा घरे घेतली तेव्हा त्यांना ‘केडीएमसी’च्या खोट्या परवानग्या दाखवून फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी बिल्डरांना जबाबदार धरायला हवे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. या लोकांना बेघर करु देणार नाही, याला आमचे प्राधान्य आहे. यासाठी वकिलांची एक टीम रहिवाशांना उपलब्ध करुन देऊ. कोर्टात पुन्हा कशाप्रकारे नव्याने बाजू मांडता येईल अशी माहिती खासदार डॉ. शिंदे यांनी दिली.