Monday, June 16, 2025

मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक

मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक
इंफाळ : मागील २४ तासांत मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपुर, काकचिंग या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या अतिरेक्यांकडून शस्त्रसाठा, संपर्काची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्फोटके, चिथावणी देणारे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या अतिरेक्यांमध्ये निवडक धोकादायक अतिरेक्यांचा समावेश आहे. काही अतिरेक्यांचा शोध मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी ठिकठिकाणी धाड टाकली. याच कारवाईत १७ अतिरेक्यांना गजाआड कण्यात आले.





राज्यपालांचे आवाहन

मणिपूरच्या राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना सात दिवसांत त्यांच्याकडे असलेली पण परवाना नसलेली अशी शस्त्र जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन जमा करण्याचे आवाहन केले आहे. ही शस्त्र जमा केल्यास पोलीस चौकशी होणार नाही, असेही आश्वासन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दिले आहे. राज्यपाल अजय कुमार भल्ला हे सरकारी सेवेत असताना आधी केंद्रीय गृह खात्याचे सचिव होते. सचिव पदावरुन निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांची नियुक्ती राज्यपाल या पदावर झाली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून राज्याशी संबंधित निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यपालांची झाली आहे. आता राज्यपालांनी केलेल्या आवाहनामुळे मणिपूरमधील घटनांकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
Comments
Add Comment