मुंबई : पृथ्वी थिएटर आणि तबलानवाज उस्ताद झाकीर हुसैन यांचे गेल्या चाळीस वर्षांपासूनचे घट्ट ऋणानुबंध जोडले गेले होते. दरवर्षी २८ फेब्रुवारीला उस्ताद झाकीर हुसैन (Zakir Hussain) पृथ्वी थिएटरमध्ये कार्यक्रम करत असत. मात्र गेल्यावर्षी त्यांचे निधन झाले आणि ही परंपरा खंडित झाली. यावर्षी उस्ताद झाकीर हुसैन यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पृथ्वी थिएटरमध्ये आजवर रंगलेल्या मैफिली ध्वनीचित्रफितींद्वारे रसिकांना पुन्हा अनुभवता येणार आहेत. ‘गुजिश्ता यादें’ या नावाने होणाऱ्या कार्यक्रमांतर्गत या ध्वनीचित्रफितींद्वारे उस्ताद झाकीर हुसैन यांनी गेल्या वीस वर्षात पृथ्वी थिएटरमध्ये केलेले कार्यक्रम दाखवण्यात येणार आहेत.
पृथ्वी थिएटरच्या संस्थापक जेनिफर केंडल यांचे १९८४ मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांच्या जन्मदिनी २८ फेब्रुवारीला पृथ्वी थिएटरमध्ये उस्ताद झाकीर हुसैन आपला कार्यक्रम सादर करत असत. पहिल्या वर्षी त्यांनी जेनिफर केंडल यांना कार्यक्रम समर्पित केला होता.
२१ आणि २२ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता आणि रात्री ८ वाजता ध्वनीचित्रफीत दाखवली जाईल. तर २३ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता, सायंकाळी ५ वाजता आणि रात्री ८ वाजता तीन वेगवेगळ्या ध्वनीचित्रफिती पाहायला मिळणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वाने पृथ्वी थिएटर येथे ‘गुजिश्ता यादें’ नावाने उस्ताद झाकीर हुसैन यांच्या मैफिली रसिकांना अनुभवायला मिळतील. (Zakir Hussain)