अलिबाग : शासनाची सर्व कार्यालये हळूहळू कॅशलेस होत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता एसटीमधील प्रत्येक वाहकाकडे त्यांच्या जवळील मशीनमध्ये क्यूआर कोडची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची चिंता आणि त्यावरून होणारे वाद आता होणार नाहीत. एसटी बसमधील वाहकाकडे प्रवास करताना अनेकदा तिकिटाचे पैसे सुट्टे देण्या-घेण्यावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वादावादी होत असते. त्याचा प्रवाशांना मन:स्ताप होत असतो; परंतु आता प्रवासी एसटीचे तिकीट खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. जिल्ह्यात ही सुविधा वाहकांच्या तिकीट यंत्रावर करण्यात आली आहे.
Kalyan News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील त्या जप्त मालमत्तांचा होणार फेरलिलाव
या सुविधेस सध्या प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्या कटकटीतून सुटका झाल्याचे समाधान प्रवाशांना मिळत आहे. मॉलपासून चहाच्या टपरीपर्यंत अन् भाजी विक्रेत्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सध्या सगळ्यांकडेच डिजिटल पेमेंट वॉलेट, यूपीआय असल्यामुळे रोख पैशांची गरज कमी झाली आहे. एसटीचा क्यूआर कोड सर्व पेमेंट वॉलेटला चालणार आहे. त्यामुळे गुगल पे असो वा फोन पे अशा प्रत्येक वॉलेटवरून पैसे दिले जाऊ शकतात.
महामंडळाच्या जेवढ्या बसेस जिल्ह्यात सध्या धावताहेत, त्या प्रत्येक बसमध्ये क्यूआर कोडची सुविधा दिली जात आहे. त्याचा लाभही सध्या प्रवाशांकडून घेतला जात आहे. मात्र बसच्या आरक्षणासाठी अद्याप यूपीआय पेमेंटची सोय उपलब्ध नाही. डेबिट व क्रेडिट कार्डचा वापरही दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे. त्यामुळे एसटीची पेमेंट प्रक्रिया सुलभ पद्धतीने होत आहे. एसटी बसमध्ये पूर्वी चिल्लर पैशावरून प्रवासी व वाहकांत वाद होत असत. बऱ्याचदा पैसे नंतर देतो म्हणून प्रवाशांना सांगितले जात होते. आता चिल्लर पैसे बाळगण्याची चिंता मिटली आहे.