Thursday, March 27, 2025
Homeकोकणरायगडसाळाव पुलाच्या कामामुळे कांदळवन धोक्यात

साळाव पुलाच्या कामामुळे कांदळवन धोक्यात

सुमारे अडीच हेक्टर क्षेत्राचे नुकसान होण्याची भीती

अलिबाग : अनेक जलचर प्राणी, खेकडे, मासे, झिंगा या जीवांचे आश्रयस्थान असणारे रेवदंडा परिसरातील कांदळवन आता अलिबाग–मुरुड तालुक्यांना जोडणाऱ्या साळाव पुलाच्या कामामुळे कांदळवन धोक्यात आले आहे.प्रस्तावित रेवस-रेड्डी प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नेस्तनाबूत होणार असून, त्यामुळे समुद्रातील जीवांबरोबरच मासेमारीचा व्यवसायही धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात असून, मच्छीमारांचे कायमस्वरुपी रोजगाराचे साधन बंद होणार असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात आले.

सध्या औद्योगिकरण वाढत असून, पर्यटनामुळे कोकणातील वर्दळही प्रचंड वाढली आहे. रायगडसह कोकणात पर्यटनासाठी जाताना वेळेवर पोहचता यावे, यासाठी रेवस ते रेड्डी हा सागरी महामार्ग विकसित केला जाणार आहे. अलिबाग तालुक्यातील रेवस ते सिंधूदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंत असणारा हा रस्ता ४९८ किलोमीटरचा आहे. या महामार्गाला रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे जोडले जाणार आहेत. या महामार्गामध्ये वेगवेगळ्या नवीन पुलांची उभारणी केली जाणार आहे. त्यामध्ये रेवदंडा येथील साळाव हा पूल असणार आहे.

Chhava Movie : आता सर्व महिलांना मोफत बघता येणार ‘छावा’ चित्रपट

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत त्याचे काम केले जाणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रेवदंडा-साळाव नवीन पूल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रेवदंडा बंदरालगत असलेले कांदळवनाचे सुमारे अडीच हेक्टर क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे. त्या कांदळवनात लाल झेंडे लावण्यापासून पुलासाठी कांदळवनाची जमीन किती घ्यायची याचे मोजमाप गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे.

या पुलामुळे कांदळवनात आश्रय घेणारे खेकडे, झिंगा व इतर जलचर प्राणी नष्ट होण्याची भीती आहे. तसेच मच्छीमारांवरही मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी यामुळे मच्छीमारांचा रोजगार जाणार असल्याचे तेथील मच्छीमारांकडून सांगण्यात आले आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा-साळाव पूल जुना झाल्याने त्याची अनेकदा डागडुजीसुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान, या पुलाला पर्यायी म्हणून नवीन पुलाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदळवनाची कत्तल करण्यात येणार आहे.

जुन्या पुलाच्या बाजूलाच नवीन पूल बांधण्यात येत आहे; परंतु साळाव पुलापासून जवळपास तीनशे मीटर आत जेट्टीच्या बाजूला हा पूल उभारला जाणार आहे. त्यामुळे रेवदंडा बायपासच्या बाजूचे कांदळवन यामुळे नष्ट होणार आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणावर चालविली जाणारी कुऱ्हाड स्थानिकांसह पर्यावरणप्रेमींना मान्य नसून, त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कांदळवनाचे संरक्षण काळाची गरज

पर्यावरणाचा समतोल, सागरी संपत्तीचे जतन करण्यासाठी कांदळवन संरक्षण ही काळाची गरज आहे. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कांदळवनाची मदत होते. समुद्राकडून वाहत आलेला गाळ कांदळवनाच्या फांद्या व मुळांपामुळे अडवला जातो. वादळी वारे व इतर आपत्तीच्या काळात नैसर्गिक संरक्षण भिंतीचे काम कांदळवन करतात. कांदळवन ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. समुद्र लाटांबरोबर होणारी जमिनीची धूपही कांदळवने थांबवते. कांदळवनामुळे समुद्रातील अन्नसाखळी टिकून राहते. त्सुनामीचा तडाखाही सक्षमपणे थोपविण्यास कांदळवनांची मदत होते.

स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घ्यावे

दर्यातरंग मच्छीमार सोसायटी रेवदंडाचे चेअरमन सुधाकर गुंडा यांच्या मते रेवस-रेड्डी सागरी महामार्गामध्ये नवीन पूल बांधले जाणार आहे. कांदळवनाचे नुकसान होण्याबरोबरच तेथील मच्छीमारांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे. मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे कायमस्वरुपी साधन बंद होईल. शासनाने प्रकल्प उभारताना स्थानिक मच्छीमारांना विश्वासात घेऊनच काम करावे. तसेच त्यांना योग्य तो मोबदला दिला जावा.

साळाव पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यासाठी कांदळवनाचे क्षेत्र जाण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाकडून त्याची पाहणी करण्यात आली आहे. परवानगी घेतल्याशिवाय कांदळवन तोडू दिले जाणार नाही. कांदळवन तोडताना निकष देण्यात आले आहेत. – समीर शिंदे, (वन परिक्षेत्र अधिकारी, कांदळवन विभाग)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -