नवी दिल्ली : भाजपाने छत्तीसगडमधील १० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला. छत्तीसगडमधील रायगड नगर निगम महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर उभा असलेला चहावाला विजयी झाला. चहावाला छत्तीसगडमधील रायगड नगर निगमचा महापौर झाला. आता चहाचा व्यवसाय सांभाळत नागरिकांचे प्रश्न सोडवणार, असे महापौर जीवर्धन चौहान म्हणाले. त्यांनी रायगड नगर निगममधील नागरिकांचे रोजचे जगणे सुसह्य करण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचे जाहीर केले.
मुंबईत मानवतेला काळिमा फासणारी घटना, जन्मदात्याने चार वर्षांच्या मुलीला जमिनीवर आपटून मारले
रायगड नगर निगमच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या जीवर्धन चौहान यांनी काँग्रेसच्या जानकी काटजू यांचा पराभव केला. जीवर्धन चौहान यांनी महापौरपदाची निवडणूक ३४ हजार ३६५ मतांनी जिंकली.
जनतेने विकासाकरिता भाजपावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थ ठरवणार, असे जीवर्धन चौहान म्हणाले. रायगड नगर निगममध्ये भाजपाने ३३ प्रभागांमध्ये (वॉर्ड) विजय मिळवला. काँग्रेस १२ प्रभागांपुरती मर्यादीत राहिली. बहुजन समाज पक्षाने एक आणि अपक्षांनी दोन प्रभाग जिंकले. प्रभागांच्या निवडणुकीसाठी १४४ तर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात होते.
काँग्रेस उपनेते गौरव गोगोईंच्या पत्नीचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन ?
भाजपाने छत्तीसगडमध्ये सर्वच्या सर्व १० नगर निगम, ४९ पैकी ३५ नगरपालिका, ११४ पैकी ८१ नगर पंचायती जिंकल्या. याआधी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने ९० पैकी ५४ आणि लोकसभेच्या निवडणुकीत ११ पैकी १० जागांवर विजय मिळवला होता.