मुंबई : गोरेगावमधील पत्राचाळीतील रहिवाशांचा मागील १५ ते १६ वर्षांपासून घरांसाठी संघर्ष सुरु होता. म्हाडाकडून पत्राचाळ पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे. २०२२ पासून म्हाडाकडून याचे बांधकाम सुरु होते. आता ते पूर्ण झाले असून लवकरच पत्राचाळीतील ६७२ रहिवाशांच्या घरांची प्रतिक्षा संपणार आहे. येत्या मार्च महिन्यामध्ये या रहिवाशांना या घरांचा ताबा मिळणार आहे.
पत्राचाळीच्या रहिवाशांना घरांसाठी मोठा संघर्ष करावा लागला आहे. सोबतच विकासकांनी केलेल्या परवडीनं त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. आता त्यांचा संघर्ष संपला असून त्यांना हक्काची घरे देण्यात येणार आहेत. पत्राचाळीतील रहिवाशांसाठी १६ इमारतीत २.५ बीएचकेचे ६५० चौ.फुटाचे घर आणि त्याला ११७ चौ.फुटाची बाल्कनी देण्यात आली आहे. सोबतच, सुसज्ज असे दोन मजली पार्किंग, दोन गार्डन परिसर, फिटनेस सेंटर आणि मेडिटेशन सेंटर देखील देण्यात आले आहेत.
पुढील महिन्यात पत्राचाळीतील रहिवाशांना चाव्या देण्यासंदर्भात कार्यक्रम केला जाऊ शकतो. मात्र, म्हाडाकडून दिलेली कमिटमेंट पूर्ण न केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. म्हाडाने इमारतीच्या ठिकाणी ७२ कमर्शिअल दुकाने बांधल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
असे असेल पत्राचाळीतील घर
– पत्राचाळीच्या जागेवर जवळपास १६ इमारतींची उभारणी.
– या इमारतीतील घर ६५० चौ.फुटाची असून ११७ चौ. फुटाची अतिरिक्त बाल्कनी देखील याला देण्यात आली आहे.
– अडीच हजार चौ.फुटांचे दोन कम्युनिटी हॉलची देखील उभारणी केली गेली आहे.
– दोन मजली पार्किंग, जिमनॅशियम, मेडिटेशन सेंटर आणि लहान मुलांना खेळण्यासाठीची सोय देखील केली गेलीय.
– प्रत्येक विंगला दोन लिफ्ट आणि एक स्टेअरकेसची उभारणी आहे.
– प्रत्येक फ्लॅटधारकाला एका पार्किंगची व्यवस्था देखील केली गेली आहे.