पुणे : आरटीई २५ टक्के प्रवेशासाठीची निवड यादी जाहीर करण्यात येत आहे. लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत संधी देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली. २०२५-२६ या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी शिक्षण आयुक्तांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आली. (RTE Admission)
गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीई २५ टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तालुकास्तर व वॉर्डस्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे. लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आरटीई पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यार्थ्यांचे नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील. विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलविले आहे. त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी.
पडताळणी समितीने रहिवासी पत्ता, गुगलवरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी. या दृष्टीने आवश्यक सुविधा गटशिक्षणाधिकारी स्तरावर करण्यात यावेत. प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही. मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही, याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे. (RTE Admission)
…तर प्रवेश होणार रद्द
विद्यार्थ्यांनी खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने नियमानुसार राबविली जात असून, प्रवेश प्रक्रियेंतर्गत प्रवेश क्षमतेएवढ्या विद्यार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड होणार आहे. पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलोभने दिले जात असतील, तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्यामार्फत करण्यात आले आहे.