Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रक्रीडाठाणे

दहावी-बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेसगुण अर्ज

दहावी-बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेसगुण अर्ज
ठाणे (प्रतिनिधी): प्रतिवर्षी इयता १० वी व १२ वीच्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा ग्रेसगुण प्रस्ताव ऑफलाईन अर्ज मागविले जात होते व त्या माहितीचे संकलन कार्यालयाद्वारे करण्यात येऊन ते गुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंडळात पाठविले जात असतात. या शैक्षणिक वर्षापासून ग्रेस गुणासाठी केली जाणारी प्रक्रिया “आपले सरकार” प्रणालीद्वारे ऑनलाईन करण्यात येणार आहे. तसेच या पोर्टलद्वारे सर्व अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडे सादर करण्याची सुविधा शासनातर्फे निर्माण करून देण्यात आली आहे. यावर्षीपासून जिल्ह्यातील सर्व खेळाडू विद्यार्थी, माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी “आपले सरकार” या प्रणालीद्वारे सवलत गुणांचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेतील सहभाग अथवा प्राविण्य प्रमाणपत्राच्या सवलत गुणांसाठी केवळ ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जाची प्रत शिक्षण मंडळासही प्रणालीद्वारे आपोआप पाठविली जाईल. त्यासंदर्भात कोणत्याही खेळाडूने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अथवा शिक्षण मंडळास ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू नये. अशा प्रकाराचे ऑफलाईन अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून स्वीकारला जाणार नाहीत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० मार्च असून विहित मुदतीत सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने “आपले सरकार” या प्रणालीवर सादर करावेत, असे आवाहन ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.
Comments
Add Comment