Friday, May 9, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

Delhi Chief Minister 2025 : दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण? ‘या’ सात नावांची जोरदार चर्चा

Delhi Chief Minister 2025 : दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण? ‘या’ सात नावांची जोरदार चर्चा

नवी दिल्ली : तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होणार असून, मुख्यमंत्रीपदासाठी (Delhi Chief Minister) अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवला असून, आता दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? (Who is the next Chief Minister of Delhi) याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.


भाजपा हायकमांड लवकरच अंतिम निर्णय घेणार असले तरी, सध्या प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा आणि मनोज तिवारी यांची नावे चर्चेत आहेत.



१) प्रवेश वर्मा – केजरीवालांचा पराभव करणारा उमेदवार


आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा (Parvesh Verma) हे मुख्यमंत्रीपदाच्या प्रमुख दावेदारांपैकी एक मानले जात आहेत. प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या पश्चिम दिल्ली मतदारसंघातून १० वर्षांपासून खासदार आहेत. ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत.


प्रवेश वर्मा हे जाट समुदायाचे प्रभावशाली नेते मानले जातात आणि त्यांची जाट आणि गुर्जर समाजात मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळू शकते. मात्र, त्यांनी स्पष्ट केले आहे की, “मुख्यमंत्री कोण होणार हे पक्ष ठरवेल आणि सर्वजण तो निर्णय मान्य करतील.”



२) वीरेंद्र सचदेवा – दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्ष


दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचेही नाव चर्चेत आहे. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीच्या सत्तेत प्रवेश केला आहे. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजपाला मोठा विजय मिळवता आला. त्यामुळे हायकमांड त्यांच्यावर विश्वास दाखवू शकते.



३) मनोज तिवारी – पूर्वांचल मतदारांमध्ये लोकप्रिय चेहरा


दिल्ली भाजपाचे माजी अध्यक्ष आणि तीन वेळा खासदार राहिलेले मनोज तिवारी (Manoj Tiwari) हेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. ते पूर्वांचल समुदायात अत्यंत लोकप्रिय आहेत आणि पक्षासाठी स्टार प्रचारक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावतात.



मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ही चार नावे देखील आघाडीवर आहेत..


 

४) विजेंद्र गुप्ता (विधानसभा विरोधी पक्षनेते, रोहिणी मतदारसंघ)

५) रेखा गुप्ता (शालीमार बाग मतदारसंघ)

६) दुष्यंत गौतम (राष्ट्रीय महामंत्री आणि अनुसूचित जातीतील मोठे नेते, करोलबाग मतदारसंघ)

७) आशीष सूद (जनकपुरी मतदारसंघ)

भाजपा हायकमांडचा निर्णय लवकरच अपेक्षित


मध्य प्रदेश (Madhya Pradesh), राजस्थान (Rajasthan) आणि हरियाणा (Haryana) मध्ये भाजपाने आऊट ऑफ द बॉक्स विचार करत अनपेक्षित चेहरे मुख्यमंत्रीपदी नेमले होते. त्यामुळे दिल्लीमध्येही कोणाला संधी मिळणार, यावर चर्चा रंगली आहे. लवकरच भाजपा हायकमांड अंतिम निर्णय घेईल आणि दिल्लीच्या नव्या नेतृत्वाची घोषणा होईल.

Comments
Add Comment