Tuesday, October 21, 2025
Happy Diwali

अमेरिकेचे विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू

अमेरिकेचे विमान बेपत्ता, शोधमोहीम सुरू
अलास्का : अमेरिकेचे छोटे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात नऊ प्रवासी आणि एक वैमानिक असे दहा जण आहेत.
बेरिंग एअर कंपनीच्या विमानाने उनालक्लीट येथून नोमसाठी उड्डाण केले. उड्डाणानंतर ३८ मिनिटांनी विमान बेपत्ता झाले. नियोजीत उनालक्लीट ते नोम या विमान प्रवासाला साधारण एक तास लागतो. हा वेळ उलटून गेला तरी विमान कुठेही उतरलेले नाही. रडारच्या शेवटच्या नोंदीनुसार विमान अलास्का प्रांताच्या आकाशात असताना बेपत्ता झाले आहे.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थनुसार, अमेरिकेत सर्वाधिक विमान अपघात हे अलास्का प्रांतात झाले आहेत. बेरिंग एअर कंपनीचे लहान टर्बोप्रॉप सेस्ना कॅरॅव्हन विमान अलास्का प्रांताच्या आकाशात असताना बेपत्ता झाले आहे. या विमानात प्रवासी आणि वैमानिक मिळून एकूण दहा जण आहेत. अलास्का प्रांतात उत्तुंग पर्वत, सतत असमान आणि अनेकदा प्रतिकूल असणारे वातावरण असते. यामुळे अलास्का प्रांतातून विमान प्रवास करणे कायम आव्हानात्मक असते. ताज्या घटनेत बेपत्ता असलेल्या विमानाबाबत याच कारणामुळे चिंता व्यक्त होत आहे.
अमेरिकेत महिन्याभरात दोन विमान अपघात झाले आणि एक विमान बेपत्ता आहे. राजधानी वॉशिंग्टन डी. सी. येथे प्रवासी विमान आणि ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर यांची टक्कर झाली. या अपघातात ६७ जणांचा मृत्यू झाला. तर फिलाडेल्फिया प्रांतात झालेल्या विमान अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला आणि १९ जण जखमी झाले. या दोन अपघातांनंतर आता अमेरिकेतील अलास्का प्रांतात एक विमान बेपत्ता झाले आहे.
Comments
Add Comment