Friday, June 20, 2025

'या' मुंबईकराने समुद्रकिनारी खरेदी केले १२ आलीशान फ्लॅट

'या' मुंबईकराने समुद्रकिनारी खरेदी केले १२ आलीशान फ्लॅट
मुंबई : उदय कोटक यांना कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक म्हणून अनेकजण ओळखतात. आता ते मुंबईतील फ्लॅट खरेदीमुळे चर्चेत आले आहेत. अब्जाधीश बँकर उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी संयुक्तपणे सुमारे २०२ कोटी रुपये खर्चून मुंबईत समुद्रकिनारी १२ आलीशान फ्लॅट खरेदी केले.



वरळी सी फेस परिसरात शिव सागर इमारतीत उदय कोटक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांनी संयुक्तपणे १२ आलीशान फ्लॅट खरेदी केले. खरेदी केलेल्या फ्लॅटची नियमानुसार रजिस्ट्रेशन फी आणि स्टँप ड्युटी भरुन नोंदणी करण्यात आली आहे. कोट्यवधींच्या फ्लॅट खरेदीत कोटक कुटुंबाने दोन लाख ७० हजार रुपये प्रति चौरस फूट या दराने व्यवहार केला आहे.



दक्षिण मुंबईतील वरळी सी फेस भागात उद्योगपती, व्यावसायिक, वकील, डॉक्टर, इंजिनिअर, आयटी तज्ज्ञ अशा अनेक कोट्यधीश मुंबईकरांची घरं आहेत. यात आता कोटक कुटुंबाच्या १२ फ्लॅटची भर पडली आहे. कोटक कुटुंबाने केलेला सौदा हा मुंबईत झालेला सध्याच्या काळातला सर्वात मोठा घर खरेदीचा आर्थिक व्यवहार आहे.

शिव सागर इमारतीत कोटक कुटुंबाने ९ मे २०२४ रोजी ७३५ चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला. यानंतर परिसर आवडल्याचे कारण देत कोटक कुटुंबाने शिव सागर इमारतीत आणखी ११ फ्लॅटची खरेदी केली. या ११ फ्लॅटची नोंदणी ३० जानेवारी २०२५ रोजी झाली. कोटक कुटुंबाने तळमजला, पहिला मजला आणि दुसरा मजला येथील एकूण १२ फ्लॅट खरेदी केले. या व्यवहाराद्वारे कोटक कुटुंबाने ७ हजार ४१८ चौरस फुटांचा परिसर २०१.८८ कोटी रुपये खर्चून खरेदी केला आहे. फ्लॅट उदय कोटक, त्यांची पत्नी पल्लवी, मुलगे धवल आणि जय तसेच वडील सुरेश यांच्या नावावर आहेत.

कोटक महिंद्रा ही भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी खासगी बँक आहे. उदय कोटक यांचे आता बँकेत २६ टक्के शेअर्स आहेत. ते देशातील दहाव्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत नागरिक आहेत.
Comments
Add Comment