कृष्णगिरी : तामिळनाडूच्या कृष्णागिरीमधील बारगुर येथील शाळेच्या आवारात १३ वर्षीय विद्यार्थीनीवर ३ शिक्षकांनी लैगिंक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी (डीईओ) तिन्ही आरोपी शिक्षकांना निलंबित केले आहे. तसेच त्यांना लैंगिक गुन्ह्यांपासून बाल संरक्षण कायद्याच्या (पोस्को) विविध कलमांखाली त्यांना अटक केली आहे. संशयित आरोपी शिक्षकांना १५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती कृष्णगिरीचे जिल्हाधिकारी सी दिनेश कुमार यांनी दिली.
पीडित मुलगी ३ जानेवारीपासून शाळेत येत नव्हती, त्यानंतर शाळेने तिच्या घरी जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली यानंतर शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलीच्या पालकांनी बारगुर ऑल वुमन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पीडितेला आवश्यक समुपदेशन देण्यात आले आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिस स्टेशनच्या शिफारशीनुसार, पीडितेच्या पालकांनी बाल सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पीडितेला आवश्यक समुपदेशन देण्यात आले आहे. जिल्हा बाल सुरक्षा अधिकारी आणि पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.