Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीसंत तुकारामांच्या वंशजाने आत्महत्येआधी लिहिली चार पत्र

संत तुकारामांच्या वंशजाने आत्महत्येआधी लिहिली चार पत्र

देहू : संत तुकारामांचे अकरावे वंशज शिरीष मोरे (३०) यांनी घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्याआधी शिरीष मोरे यांनी आई – वडील, कुटुंबातील इतर सदस्य, मित्रपरिवार, होणारी पत्नी यांना प्रत्येकी एक अशी चार पत्र लिहिली होती. या पत्रांवरुन आर्थिक अडचणींमुळे शिरीष मोरेंनी आत्महत्या केल्याचे लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांच्या वंशजाने केली आत्महत्या

पहिले पत्र निवडक मित्रांसाठी

‘प्रिय आकाश, मनिष, अक्षय, अजय आणि सर्व मित्रांनो,

मी युद्धाच्या मैदानातून पळून जातोय, हे मला ठाऊक आहे, पण तुमच्याकडे हात जोडून विनंती करतो – माझ्या आई-वडिलांची काळजी घ्या. माझ्या बहिणीला चांगले स्थळ पाहा आणि तिचे लग्न लावा. माझ्या डोक्यावर प्रचंड कर्ज आहे – मुंबई सिंगवी १७ लाख, बचत गट ४ लाख, सोने तारण २.२५ लाख, गाडी ७ लाख आणि किरकोळ ८० हजार रुपये. गाडी विकून काही फिटेल, पण उरलेलं कर्ज तुम्ही मिळून काहीतरी करून फेडा. मला ठाऊक आहे, मी हे सहज करू शकलो असतो, पण आता लढण्याची ताकद नाही. मला माफ करा’

दुसरे पत्र कुटुंबासाठी

‘प्रिय बाळा आणि संपूर्ण कुटुंब, तुम्ही लढत राहा, हार मानू नका. आयुष्य थांबवू नका. मी संपलोय, पण तुम्ही अजून खूप मोठं होणार आहात. मी हतबल झालोय, म्हणून पूर्णविराम देतोय. स्वतःची काळजी घ्या आणि आयुष्याला पुढे न्या.’

तिसरे पत्र होणाऱ्या पत्नीसाठी

शिरीष मोरे याचे २० एप्रिल २०२५ रोजी लग्न होणार होते. टिळा झाला होता. या पार्श्वभूमीवर शिरीष मोरे यांनी होणाऱ्या पत्नीला पत्र लिहिले आहे. ‘आपली कहाणी आता कुठे फुलायला सुरुवात झाली होती आणि मी तुला असं सोडून चाललोय. माझ्या वाईट काळात तू माझ्यासोबत होतीस, माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्या सोबत उभी राहिलीस. पण मी तुला न्याय देऊ शकलो नाही. मी तुझी स्वप्नं तोडतोय, याची मला जाणीव आहे. तुला एका चांगल्या मुलासोबत सुखी पाहायचं होतं, पण मी तुला फक्त दुःख दिलं. कृपा करून पुढे जा, आयुष्य सुंदर कर. खूप मोठी हो’.

चौथे पत्र आई – वडिलांसाठी

‘प्रिय मम्मी-पप्पा, दीदी, वयाच्या ३० व्या वर्षी जे काही मिळवायचे होते ते तुमच्या पाठिंब्यामुळे सहज मिळाले. तुम्ही माझ्यासाठी खूप काही केले, पण मीच आता सोडून चाललोय. कधी कधी सर्व मिळवूनही माणूस हरतोच. मी हरलो… मी थांबतोय. याचा संपूर्ण दोष माझा आहे. तुम्हाला एकटं टाकून जातोय. मला माफ करा… तुमचाच पप्प्या’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -