Tuesday, May 13, 2025

क्रीडाब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई

महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी, दोन कुस्तीपटूंवर कारवाई
नगर : महाराष्ट्र केसरी २०२५ कुस्ती स्पर्धेत हाणामारी झाली. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. स्पर्धेअखेर पंचांनी दोन कुस्तीपटूंवर कारवाई केली. डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली.



उपांत्य फेरीतील गादी विभागाच्या सामन्यात शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. पृथ्वीराज मोहोळने टाकलेल्या डावामुळे शिवराज राक्षे खाली पडला पण त्याची पाठ टेकली नसताना पंचाने पृथ्वीराज मोहोळला विजयी केले. पंचाच्या निर्णयावर शिवराज राक्षेसह त्याचे प्रशिक्षक, हितचिंतकांनी आक्षेप घेतला. शिवराज राक्षेने पंचाच्या निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे दाद मागितली. नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावर दाद मागता येत नाही. यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. या निर्णयामुळे शिवराज राक्षे संतापला. त्याने पंचाची कॉलर धरली. पंचाला लाथ मारली. यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित केल्याचे जाहीर करण्यात आले. या गोंधळात वेळ वाया गेला आणि अंतिम सामना सुमारे दीड तास उशिराने सुरू झाला.







अंतिम सामन्यात सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आमनेसामने होते. या लढतीत निळी जर्सी घातलेल्या महेंद्र गायकवाडने आक्रमक पवित्रा घेतला. पृथ्वीराज मोहोळ प्रतिकार करत होता. नियमानुसार ३० सेकंदाच्या कालावधीत महेंद्रने एकही गुण न घेतल्याने पृथ्वीराजला एक गुण देण्यात आला. या गुणाच्या आधारे पृथ्वीराजने पहिल्या फेरीत शून्य - एक अशी आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराज मोहोळच्या निष्क्रियतेचा फायदा महेंद्र गायकवाडला झाला. यामुळे गुणांची एक - एक अशी बरोबरी झाली. सामना संपण्यासाठी शेवटची काही सेकंद शिल्लक होती. झटपट गुण मिळवण्याच्या प्रयत्नात महेंद्र गायकवाड मॅटच्या अर्थात गादीच्या बाहेर गेला. पंचांनी पृथ्वीराज मोहोळला एक गुण दिला. यानंतर महेंद्र गायकवाडनेही गुणासाठी अपील केले. पृथ्वीराज मोहोळ मॅटच्या बाहेर गेला, असे त्याचे म्हणणे होते. पण पंचांनी अपील फेटाळले. यानंतर नाराज झालेल्या महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. महेंद्र गायकवाडने मैदान सोडल्यामुळे पंचांनी पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. पृथ्वीराज मोहोळला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि 'थार' जीपची चावी देण्यात आली. या प्रसंगी केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय भरणे उपस्थित होते.







निकालानंतर महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीमार करुन महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांना मैदानातून बाहेर काढले. महेंद्र गायकवाडच्या वर्तनाची गंभीर दखल घेऊन त्याच्यावर तीन वर्षांची बंदी घातली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कारवाई केली आहे. या कारवाईमुळे शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांना तीन वर्षे महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खेळता येणार नाही.



खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने खेळणे अपेक्षित आहे. पंचांच्या निर्णयाविरोधात दाद मागण्याबाबत निश्चित असे नियम आहेत. या नियमांच्या चौकटीत राहून निर्णय झाले आहेत. पंचांना लाथ मारणे, शिव्या देणे हे खेळाडूला शोभत नाही. पण खेळाडू अशोभनीय आणि क्रीडा भावनेच्या विरोधात जाणारे असे वर्तन करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, अशी भूमिका घेत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांवर कारवाई केल्याचे जाहीर केले.
Comments
Add Comment