नवी दिल्ली : टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध टी- २० मालिका खेळत आहे. त्यानंतर उभयसंघात एकदिवसीय मालिका होणार आहे. तर त्यानंतर आयसीसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. मात्र त्याआधीच टीम इंडियाचा दिग्गज विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) निवृत्त झाला आहे. बंगालकडून खेळणाऱ्या या दिग्गज फलंदाजाचा रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पंजाबविरुद्धचा सामना हा अखेरचा ठरला. बंगाल टीमने ऋद्धीमानला विजयी निरोप दिला. बंगाल विरुद्ध पंजाब यांच्यातील सामना हा ऐतिहासिक इडन गार्डनमध्ये खेळवण्यात आला. सामन्यानंतर साहाला सहकाऱ्याकडून अविस्मरणीय निरोप देण्यात आला. साहाने निवृत्तीनंतर एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक भलीमोठी पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या.
Big Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’चा धमाका; पुन्हा दिसणार गुलीगत मॅन!
“आज मी जो काही आहे, आयुष्यात जे काही मिळवलंय, मी शिकलेला प्रत्येक धडा, या सर्वांचं श्रेय या अद्भूत खेळाला देतो. क्रिकेटने मला आनंदाचे क्षण, अविस्मरणीय विजय आणि अमूल्य अनुभव दिले आहेत. क्रिकेटने माझी कसोटीही घेतलीय आणि त्याचा सामना कसा करायचा हे देखील शिकवलंय”, असं म्हणत साहाने त्याच्या जीवनावर असलेल्या क्रिकेटच्या प्रभावाबाबत सांगितलं. चढ उतार, विजय-पराजयाने या प्रवासात मला तसे घडवलेय जो मी आज आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट होतोच, त्यामुळे मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही साहाने म्हटले.
साहाने टीम इंडियासाठी शेवटचा सामना हा २०२१ साली न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. साहा महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीनंतर २०१४ पासून आणि ऋषभ पंतच्या डेब्यूआधी टीम इंडियाचा नियमित सदस्य होता. साहाला त्याच्या अखेरच्या सामन्यात काही खास करता आलं नाही. साहाला पहिल्या डावात भोपळाही फोडता आला नाही. तसेच बंगालने डावासह सामना जिंकल्याने दुसऱ्या डावात बॅटिंगची संधीही मिळाली नाही. बंगालने पंजाबवर १ डाव आणि १३ धावांनी विजय मिळवला. साहाला सामन्यानंतर सहकाऱ्यांनी खांद्यावर उचलून घेतलं.