नवी दिल्ली : जागतिक घडामोडी विशेषतः अमेरिका आणि इतर देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू आहे. परिणामी भारताचा रुपया डॉलरच्या तुलनेत ८७ रुपयांवर पोहोचला. डाॅलरच्या तुलनेत रुपयाने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला आहे. कोरिया, मलेशिया इंडोनेशिया आणि थायलंड या देशांच्या चलनामध्ये देखील घसरण पाहायला मिळाली.
मागील काही महिन्यात रुपयाची मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे. रुपया ८७ रुपयांपर्यंत मार्च महिन्यापर्यंत घसरेल, असा अंदाज आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. मात्र, फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात डॉलरच्या तुलनेत रुपयानं नीचांकी पातळी गाठली आहे. शुक्रवारी डाॅलरच्या तुलनेत रुपया ८६.६१ वर बंद झाला होता. मात्र, आज तब्बल ८७ प्रति डाॅलरवर रुपया पोहोचला.
भारताला मोठा झटका, फोर्ब्सच्या शक्तीशाली देशांच्या यादीतून भारत टॉप १०मधून बाहेर
अमेरिकेच्या सुधारीत आर्थिक परिस्थितीत अमेरिकन डॉलरला मजबुती मिळाली आहे. भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांच्या तुलनेत अमेरिकेतील उच्च उत्पन्नामुळे गुंतवणूकदारांसाठी अमेरिका आकर्षक ठरत आहे. अमेरिकेत नव्या सरकारच्या धोरणांबाबत अनिश्चितता देखील रुपयाच्या घसरणीला कारणीभूत आहे. सोबतच, जगातील भूराजकीय तणावांमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीतील अस्थिरता कायम, ज्यात रशिया-युक्रेन युद्ध, मध्य पूर्व संकट, लाल समुद्रातील शिपिंगसारख्या समस्यांमुळे देखील रुपया घसरला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून देखील भांडवली बाजारातून हात आखडता घेतला आहे. कमकुवत रुपयामुळे आयात बिलात वाढ, कारण आयातदार डॉलरमध्ये पैसे देतात. खाद्यतेल, डाळी, खते, तेल आणि गॅस यांच्या आयातीचा खर्च वाढतो. भारताचे कच्च्या तेलाची आयात जवळपास ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तेल आणि गॅसच्या आयातीवर मोठे परिणाम होणार आहेत. रुपया कमकुवत होणे म्हणजेच महाग आयात ज्याचे परिणाम देशातील महागाई वाढण्यास कारणीभूत ठरते.