Monday, February 10, 2025
Homeदेशभारत-इंडोनेशियातील संबंध हजारो वर्षांच्या सामायिक संस्कृती आणि इतिहासात रुजलेले : पंतप्रधान

भारत-इंडोनेशियातील संबंध हजारो वर्षांच्या सामायिक संस्कृती आणि इतिहासात रुजलेले : पंतप्रधान

नवी दिल्ली : “भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संबंध केवळ भू-राजकीय नसून हजारो वर्षांच्या सामायिक संस्कृती आणि इतिहासात रुजलेले आहेत”, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. दोन राष्ट्रांमधील बंध वारसा, विज्ञान, दृढ विश्वास, सामायिक श्रद्धा आणि अध्यात्म यावर आधारित आहेत यावर त्यांनी भर दिला. या संबंधांमध्ये भगवान मुरुगन, भगवान राम आणि भगवान बुद्ध यांचा समावेश आहे. जेव्हा भारतातील भाविक इंडोनेशियातील प्रंबानन मंदिराला भेट देतात तेव्हा त्यांना काशी आणि केदारनाथ प्रमाणेच आध्यात्मिक अनुभूती येते असे त्यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान मोदी यांनी आज इंडोनेशियातील जकार्ता येथे श्री सनातन धर्म अलायमच्या महा कुंभभिषेगमला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले. त्यांनी महामहिम, अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो, मुरुगन टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष पा हाशिम, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. कोबलन, तमिळनाडू आणि इंडोनेशियाचे मान्यवर, पुजारी आणि आचार्य, भारतीय वंशाचे सदस्य, या शुभ प्रसंगाचा भाग असलेले इंडोनेशिया आणि इतर देशातील नागरिक तसेच ज्या प्रतिभावान कलाकारांमुळे हे दैवी आणि भव्य मंदिर प्रत्यक्षात आले त्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

या समारंभाचा भाग बनता आले यासाठी आपण भाग्यवान असल्याचे विषद करताना, मोदी म्हणाले की महामहिम राष्ट्रपती प्रबोवो यांच्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम आपल्यासाठी आणखी खास झाला आहे. जकार्तापासून शारिरीक रूपाने दूर असलो तरी आपल्याला या कार्यक्रमात भावनिकदृष्ट्या जवळ असल्याची अनुभूती मिळत असून यातून भारत-इंडोनेशिया सशक्त संबंध प्रतिबिंबित होत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष प्रबोवो अलीकडेच 140 कोटी भारतीयांचे प्रेम आणि जिव्हाळा सोबत घेऊन इंडोनेशियाला गेले आणि आपल्याला विश्वास आहे की त्यांच्या माध्यमातून इंडोनेशियातील प्रत्येकाला प्रत्येक भारतीयाच्या शुभेच्छांची अनुभूती जाणवत असेल असे त्यांनी अधोरेखित केले. जकार्ता मंदिराच्या महा कुंभाभिषेगम निमित्त त्यांनी भगवान मुरुगन यांच्या इंडोनेशिया आणि जगभरातील सर्व भक्तांचे अभिनंदन केले. तिरुप्पुगझच्या स्तोत्रातून भगवान मुरुगन यांचे कायम स्तवन व्हावे आणि स्कंदशास्त्री कवचम या मंत्रांद्वारे सर्व लोकांचे संरक्षण व्हावे अशी इच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली. मंदिर बांधण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेल्या परीश्रमांबद्दल त्यांनी डॉ. कोबलन आणि त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.

काकाविन आणि सेरात रामायणाच्या कथा भारतातील वाल्मिकी रामायण, कंब रामायण आणि रामचरित मानस सारख्याच भावना जागृत करतात असे त्यांनी नमूद केले. इंडोनेशियातील रामलीला भारतातील अयोध्या येथे देखील सादर केली जाते, असे ते म्हणाले. बालीमध्ये “ओम स्वस्ति-अस्तु” ऐकल्यावर भारतीयांना भारतातील वैदिक विद्वानांच्या आशीर्वादाची आठवण होते, असे पंतप्रधान म्हणाले. इंडोनेशियातील बोरोबुदुर स्तूप भारतातील सारनाथ आणि बोधगया येथील भगवान बुद्धांच्या शिकवणींचे प्रतिबिंब आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ओदिशातील बाली जत्रा उत्सव प्राचीन सागरी सफरींचा उत्सव साजरा करतो. या सफरींनी एकेकाळी भारत आणि इंडोनेशियाला सांस्कृतिक आणि व्यावसायिकदृष्ट्या परस्परांशी जोडल होते, असे त्यांनी सांगितले. आजही जेव्हा भारतीय गरुड इंडोनेशिया एअरलाइन्सने प्रवास करतात तेव्हा त्यांना सामायिक सांस्कृतिक वारसा दिसतो, असे ते म्हणाले.

भारत आणि इंडोनेशियामधील संबंध अनेक मजबूत धाग्यांनी विणलेले आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राष्ट्रपती प्रबोवो यांच्या अलिकडच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी या सामायिक वारशाच्या अनेक पैलूंची प्रशंसा केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. जकार्तामधील नवीन भव्य मुरुगन मंदिर शतकानुशतके जुन्या वारशात एक नवीन सुवर्ण अध्याय जोडते यावर त्यांनी प्रकाश टाकला. हे मंदिर श्रद्धा आणि सांस्कृतिक मूल्यांचे एक नवीन केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जकार्तामधील मुरुगन मंदिरात केवळ भगवान मुरुगनच नाहीत तर इतर विविध देवतांचेही वास्तव्य आहे हे लक्षात घेऊन, ही विविधता आणि बहुलता आपल्या संस्कृतीचा पाया आहे यावर पंतप्रधान मोदी यांनी भर दिला. इंडोनेशियामध्ये, विविधतेच्या या परंपरेला “भिन्नेका तुंगल इका” म्हणतात, तर भारतात, ती “विविधतेतील एकता” म्हणून ओळखली जाते, असे ते म्हणाले. विविधतेच्या या स्वीकृतीमुळेच इंडोनेशिया आणि भारत दोन्ही ठिकाणी विविध धर्माचे लोक परस्पर सुसंवादाने सहजीवन जगतात हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हा शुभ दिवस आपल्याला विविधतेमधील एकतेचा स्वीकार करण्यास प्रेरित करतो, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

“सांस्कृतिक मूल्ये, वारसा तसेच परंपरा भारत आणि इंडोनेशियामधील लोकांमधील संबंध आणखी दृढ बनवत आहेत”, असे मोदी म्हणाले. प्रम्बानन मंदिराचे जतन करण्याचा संयुक्त निर्णय आणि बोरोबुदुर बौद्ध मंदिराप्रती सामायिक वचनबद्धतेवर त्यांनी प्रकाश टाकला. अयोध्येतील इंडोनेशियन रामलीलेचा पंतप्रधानांनी उल्लेख केला आणि अशा कार्यक्रमांना अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती प्रबोवो यांच्या सोबतीने आपण या दिशेने वेगाने प्रगती करू, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. भूतकाळच सुवर्ण भविष्याचा पाया रचेल, यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधानांनी राष्ट्रपती प्रबोवो यांचे आभार मानून आणि मंदिराच्या महाकुंभभिषेगनिमित्त सर्वांचे अभिनंदन करून भाषणाचा समारोप केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -