Thursday, September 18, 2025

सलग दुसऱ्यांदा भारतीय मुलींचा संघ १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत

सलग दुसऱ्यांदा भारतीय मुलींचा संघ १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
क्वालालंपूर : भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंडने वीस षटकांत आठ बाद ११३ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने पंधराव्या षटकातच उपांत्य सामना जिंकला. टीम इंडियाने नऊ गडी राखून इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. मोठा विजय मिळवत भारताने दिमाखात विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताच्या पारुनिका सिसोदियाच्या प्रभावी गोलंदाजीमुळे इंग्लंडची पुरती कोंडी झाली. भारताकडून पारुनिका सिसोदिया आणि वैष्णवी शर्माने प्रत्येकी तीन तर आयुषी शुक्लाने दोन बळी घेतले. इंग्लंडकडून डेविना पेरिनने ४० चेंडूत ४५ आणि ए. नोरग्रोव्हने २५ चेंडूत ३० धावा केल्या. जी. कमलिनी (५६ धावा) आणि गोंगडी तृषा (३५ धावा) यांनी भारताचा विजय सोपा केला.
आता १९ वर्षांखालील मुलींच्या टी २० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने असतील. हा सामना जिंकून विश्वचषकावर नाव कोरण्याची सुवर्णसंधी भारतीय संघाकडे आहे. याआधी २०२३ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला होता.
Comments
Add Comment