म्हाडाच्या माध्यमातून दोन वर्षात सुमारे एक लाख घरे उभारणार : उपमुख्यमंत्री शिंदे

मुंबई : गृहस्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध असून येत्या दोन वर्षात म्हाडाच्या माध्यमातून राज्यात सुमारे एक लाख घरांच्या उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी राज्याचे गृहनिर्माण धोरण देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज केले.


पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री श्री. अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे काढण्यात आली. यावेळी श्री. शिंदे बोलत होते.


या प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री शिंदे म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याकरिता केंद्र सरकार देशभरात चार राज्यांमध्ये ग्रोथ हब उभारणार आहे. यापैकी एक मुंबई महानगर क्षेत्रात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योग, आयटी कंपन्या, सेवा क्षेत्रांचा समावेश असणार आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी वर्ग निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा तब्बल आठ लाख घरे उभारणार आहे. तसेच योजनाबद्ध गृहनिर्मिती अंतर्गत भाडेतत्वावरील घरे आणि नोकरी करणाऱ्या महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी ठिकठिकाणी वसतिगृह देखील उभारले जाणार आहेत, अशी माहिती श्री शिंदे यांनी दिली. तसेच ते पुढे म्हणाले की मुंबई शहराच्या भौगोलिक सीमा लक्षात घेता समूह पुनर्विकासद्वारे ईको-फ्रेडली गृहनिर्मितीवर देखील भर दिला जाणार आहे.


तसेच ते म्हणाले की, राज्यातील नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे याचा आनंद आहे. म्हाडा पुणे मंडळाच्या ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित सोडतीमध्ये अनामत रकमेसह ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जदारांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडाच्या) पारदर्शक कार्यप्रणालीवर दाखवलेला हा विश्वास आहे. अर्जदारांचा हाच विश्वास सार्थ ठरवण्यासाठी घरांची गुणवत्ता व सोडतीच्या पारदर्शकतेमध्ये कुठेही तडजोड न करता सोडतीतील विजेत्या अर्जदारांना तात्काळ सदनिकांचा ताबा देण्यात यावा, असे संबंधित अधिकार्‍यांना त्यांनी निर्देशित केले. महाराष्ट्र शासन विविध योजनांच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करीत आहे. 'म्हाडा'ने गेल्या दीड वर्षात १३ सोडतींच्या माध्यमातून सुमारे ३० हजार घरे उपलब्ध करून दिली आहेत, ही कौतुकास्पद बाब असल्याचे ते म्हणाले. रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लागावेत व झोपडपट्टी पुनर्विकास व्हावा यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे. मुंबई पुणे, ठाणे या शहरांमध्ये समूह पुनर्विकास योजनेद्वारे योजनाबद्ध गृहनिर्मिती करण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. पुणे येथे देखील समूह पुनर्विकास योजना राबवण्याचे सुतोवाच श्री. शिंदे यांनी केले.


याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले की, पुणे मंडळाच्या आजच्या सोडतीला लाभलेला उत्तुंग प्रतिसाद म्हणजे राज्यात परवडणार्‍या दरातील घरांची गरज अधोरेखित होते. तसेच म्हाडाच्या पारदर्शक सोडत प्रणालीवर नागरिकांचा विश्वास देखील दर्शवितो. म्हाडाचा लाभार्थी हा म्हाडासाठी मोठी गुंतवणूक असून सदर लाभार्थी हेच म्हाडाचे ब्रँड अँबेसिडर आहेत. म्हाडातर्फे उभारण्यात येणारे परवडणार्‍या दरातील घरे त्यांना संगणकीय सोडत प्रणालीद्वारे पारदर्शक रित्या वितरित केली जातात. याकामी म्हाडातर्फे मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा IHLMS २.० (Integrated Housing Lottery Management System) या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभागी होतो. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाते व त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाते. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ पारदर्शक असून त्यासाठी कुठलाही मध्यस्थ/दलाल म्हाडाने नेमलेला नाही. करिता सोडत प्रक्रियेशिवाय अन्य मार्गानी म्हाडाचे घर घेण्याचा प्रयत्न करून नागरिकांनी आपली फसवणूक होण्यापासून टाळावे , असे आवाहन श्री. पवार यांनी केले.


संगणकीय सोडत कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सभापती श्री. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. याप्रसंगी बोलतांना त्यांनी पुणे मंडळाच्या माध्यमातून आजवर मोठ्या प्रमाणात परवडणारी घरे उपलब्ध करून दिले आहेत व भविष्यात याकामी सदैव प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले. तसेच ते पुढे म्हणाले की, पुणे मंडळाच्या अखत्यारीतल प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य योजने अंतर्गत ताथवडे, म्हाळुंगे, सासवड, पुरंदर येथील सदनिका विक्री सुरू असून अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले.


म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत यूट्यूब व फेसबूक समाजमाध्यम व्यासपीठांवरुन सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. यामध्ये विविध ठिकाणांहून सुमारे ४८,००० नागरिकांनी सहभाग घेतला.


सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.


यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल, ठाणे जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. सौरभ राव, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल वानखडे, म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. राहुल साकोरे, उपमुख्य अभियंता श्री. सुनील ननावरे, श्री. अनिल अंकलगी, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके, उपमुख्य अधिकारी श्री. अतुल खोडे, उपअभियंता श्रीमती मनीषा मोरे आदी उपस्थित होते.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत