पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. सीबीएसई मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्यात व्यस्त आहेत.
दरम्यान, सीबीएसईने विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार जर एखाद्या विद्यार्थ्याकडे मोबाईल फोन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळले, तर त्याला पुढील दोन वर्षे परीक्षेला बसण्यास बंदी घालण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
यापूर्वी अशा प्रकरणांमध्ये विद्यार्थ्याना एका वर्षासाठी परीक्षेवर बंदी घालण्याची तरतूद होती. याविषयी अधिक माहिती देताना सीबीएसई परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज म्हणाले की, परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरण किंवा मोबाईल वापरले किंवा ठेवले, तर विद्यार्थी केवळ या वर्षीच नव्हे तर पुढच्या वर्षीही परीक्षेला बसू शकणार नाहीत. जर कोणत्याही उमेदवाराने मार्गदर्शक तत्त्वे पाळली नाहीत, तर त्याला दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते.