नवी दिल्ली : अमेरिकेतील शॉर्ट सेलर कंपनी हिंडनबर्ग रिसर्च बंद करण्यात आली आहे. कंपनीचे संस्थापक नॅट अँडरसन यांनीच ही घोषणा केली आहे. ज्या हेतूने काम करत होतो ते पूर्ण झाले म्हणून कारभार बंद केल्याचे अँडरसन यांनी जाहीर केले आहे. यामुळे इथून पुढे हिंडनबर्ग रिसर्चच्या कोणत्याही अहवालावर सुनावणी करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. याआधी विशाली तिवारी नावाच्या व्यक्तीने ५ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज करुन हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणी एका नव्या याचिकेची नोंदणी करण्याची मागणी केली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्टारने याचिका नोंदवण्यास नकार दिला होता. आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच हिंडनबर्ग रिसर्चच्या कोणत्याही अहवालावर सुनावणी करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
विशेष म्हणजे अमेरिकेतील हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालांचा आधार घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी केंद्र सरकारवर आरोप करत होते. पण हिंडनबर्ग रिसर्च बंद होताच या विषयावर बोलणे राहुल गांधींनी टाळले आहे. यामुळे भारताच्या राजकीय वर्तुळातून हिंडनबर्ग रिसर्च प्रकरण बाद होणार का यावरुन चर्चेला उधाण आले आहे.
मागील काही वर्षात हिंडनबर्ग रिसर्चने भारतातल्या ज्या कंपन्यांविरोधात उलटसुलट अहवाल सादर केले त्या कंपन्या सध्या आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असल्याचे चित्र आहे. पण हिंडनबर्ग रिसर्च ही कंपनी बंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर इथून पुढे हिंडनबर्ग रिसर्चच्या कोणत्याही अहवालावर सुनावणी करणार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.