Monday, February 17, 2025

आकार

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

एखादा आकार जेव्हा साकार होतो तेव्हा निराकार अशा परमेश्वराचे दर्शन होते. ज्याला हे दर्शन होते तो त्याला साक्षात्कार वाटतो, तर काहींना चमत्कार वाटू शकतो!

सर्वसामान्य माणसे जेव्हा समाजात वावरतात तेव्हा त्यांना रताळे, रताळ्यासारखे वाटते; बटाटा, बटाट्यासारखा वाटतो. परंतु एखादा श्रद्धाळू असेल तर त्याला त्या रताळ्यात वा बटाट्यात गणपतीचा भास होऊ शकतो!

आजकाल सोशल मीडियाच्या काळात असंख्य फोटो आणि व्हीडिओ पाहायला मिळतात. ज्यात फळे, भाज्या, फुले, ओली/ वाळलेली लाकडे, झाडांची मुळे, दगड, रंग उडालेल्या भिंती, वाकडी तिकडी होऊन पडलेली लोखंडी कांबी यातून देव-देवतांचे वा इतरही वस्तूंचे आकार कसे दिसतात हे दाखवलेले आपण पाहतो. आपण कोणत्या दृष्टीने ती सजीव, निर्जीव वस्तू कशी ठेवतो आणि त्याकडे पाहतो व फोटो काढतो. त्यातून सामान्य माणसाला वेगवेगळे आकार दिसू लागतात आणि भाविक असेल तर त्याला निराकार परमेश्वराचे दर्शन प्रत्येकातून घडू शकते!

परवा एक फोटो पाहिला. कानाचे हेडफोन खाली ठेवल्यावर डोक्यावरून जाणारी अर्धवर्तुळाकार पट्टी ही एखाद्या डोक्यासारखी भासत होती. त्याच्या आतील इयर बर्ड्स हे डोळ्यासारखे भासत होते. त्यावर कोणीतरी आपला चष्मा ठेवला आणि अक्षरशः एक माणूस चष्मा लावून आपल्याकडे पाहतोय असा भास त्या फोटोतून होत होता. हे पाहिल्यावर लक्षात आले की, कधी कधी आपण एखादा आकार मुद्दाम घडवत नाही तर घाईघाईत खाली ठेवलेलं हेडफोन आणि चष्म्याला हा मानवी चेहऱ्याचा आकार प्राप्त झाला होता, तसे असंख्य आकार आपोआप तयार होतात.

गांधीजी दाखवताना केवळ एक अर्धगोल आणि त्याखाली दोन छोटे गोल दाखवून त्याला चष्म्याची दांडी दाखवली जाते आणि आपण सहज ओळखतो की, हे गांधीजींचे चित्र आहे. गांधीजींच्या डोक्यावर केस नसणे आणि त्यांच्या वापरात
असलेला गोल फ्रेमचा चष्मा या आकारातून गांधीजी साकारतात.

त्यामुळे कधी कधी एखादी गोष्ट लक्षात येण्यासाठी पूर्णतः समजावून सांगण्याची किंवा दाखवण्याची गरज नसते, तर चार रेषांच्या आकारातून ती स्पष्ट जाणवते. जसे कमीत कमी शब्दांत कविता लिहून त्याच्यातून फार मोठा गर्भित अर्थ व्यक्त करता येतो, त्याचप्रमाणे या चित्रकलेमधून किंवा पेंटिंग्जमधूनही कमीत कमी रेषा किंवा रंगातून आकार साकारता येतात.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात २० सुरक्षा दलाचे कर्मचारी, २६ परदेशी नागरिकांसह  १७४ माणसे मारली गेलीत. ३०० हून अधिक जखमी झाले. हल्ले करणारे ९ बंदूकधारीही मारले गेले. या सर्व मृतांना श्रद्धांजली म्हणून प्रदीप म्हापसेकर या व्यंगचित्रकाराने काढलेले व्यंगचित्र खूपच बोलके होते. त्यांनी फक्त २६ हा आकडा लिहून, एक आडवी रेषा काढून त्यापुढे दोन मेणबत्त्या काढल्या. ही जबरदस्त ताकद असते रेषांची. रेषेतून प्रतीत होणाऱ्या भावनांची!

प्रेम दाखवण्यासाठी आपण केवळ दोन्ही हातांची बोटे बदामाच्या आकाराची करून दाखवू शकतो! यातून समोरच्या व्यक्तीला सूचक अशी जाणीव करून देऊ शकतो.

अनेक आकार हे आपल्या अनुभवातून आपण आपल्या बुद्धीमध्ये साठवून ठेवलेले असतात. त्यामुळे खूप दुरूनसुद्धा आपल्याला त्या आकारानुसार वस्तू ओळखता येतात. एखाद्या भाजीवाल्याकडे काकडी, टोमॅटो, गाजर, बीट अशा वस्तू ठेवलेल्या असतील, तर बाजूने आपण वेगात एखाद्या गाडीतून जातो तरीही आपल्याला त्या चारही वस्तू पटकन लक्षात येतात. कधी कधी या आकारांना ओळखण्यासाठी रंगसुद्धा मोलाची मदत करतात. प्रत्येक वस्तूचा एक आकार ठरलेला असतो त्याप्रमाणे माणसांचाही सर्वसाधारणपणे एक आकार ठरलेला असतो. तसेच माणसाचा चेहरा, हातपाय यांचीही काही मोजमापे असतात. पण या आकारात जेव्हा बदल होतो तेव्हा ती माणसे बेढब दिसतात, म्हणजे एखाद्या माणसाचे पाय-हात-मान जरुरीपेक्षा जास्त लांब वा लहान आहे, त्याचे नाक-कान-डोळे हे इतर माणसांपेक्षा लहान वा मोठे आहेत, तर अशी माणसे चटकन लक्षात येतात. विचित्र दिसतात. पण कधी कधी हे त्यांच्यासाठी मोलाचेही होऊन जाते. कारण अशा सर्वसामान्य माणसांपेक्षा वेगळ्या शारीरिक अवयवांची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवली जाते.

आकाराचे स्वतःचे महत्त्व आहे म्हणजे चाके बनवताना ती गोल बनवली जातात तर वही-पुस्तकांचा आकार चौकोनी किंवा आयताकृती ठेवला जातो, याची कारणेही आपण जाणतोच!

एखाद्या दुकानात जेव्हा पदार्थ मांडून ठेवलेले ते किती आकर्षक दिसतात नाही? फक्त जर केकच्या दुकानाचे उदाहरण घेतले तर लक्षात घ्या की, काही केकचे तुकडे हे त्रिकोणी, चौकोनी वा गोल असतात. कदाचित त्यांच्यामध्ये वापरलेले पदार्थ सारखे असू शकतात किंवा त्यांचे रंग आणि चवीही सारख्या असू शकतात; परंतु त्यांच्या या आकारमानामुळे ते तुकडे जास्त आकर्षक दिसतात आणि वेगवेगळ्या आकाराचे पदार्थ विकत घ्यावेसे वाटतात.

एकाच घरातील चार भावंड असली तरी आकाराने ती किती वेगळी असतात. अगदी जुळी भावंड घेतली तरी कुठेतरी त्यांच्या चेहऱ्याच्या किंवा शारीरिक धाटणीत कोणत्या तरी अवयवांच्या आकारात नक्कीच फरक असतो. जर माणसे एकाच आकाराची असती तर ती एकजिनसी वाटली असती. या आकारातील फरकामुळे आपल्याला माणसे वेगवेगळी दिसतात.

जी माणसे दृष्टिहीन आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर एखाद्या वस्तूवरून हात फिरवून ते ती वस्तू ओळखतात. आपल्या माणसांनाही सहज ओळखतात. विश्वनिर्मात्याने सजीव-निर्जीवांना दिलेले वेगवेगळे आकार दिव्यांगांसाठी बनवले असतील का, त्यांचे आयुष्य थोडेफार तरी सुकर व्हावे म्हणून…?

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -