रायगड : शासन आपल्या दारी योजनेच्या कार्यक्रमात राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते फेब्रुवारी २०२३ मध्ये महागाव ग्रामपंचायत हद्दीतील १० लाभार्थी शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जनावरांच्या गोठ्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देऊन काम सुरू करण्यास मान्यता देण्याचे पत्र देण्यात आले परंतु लाभार्थी शेतकरी यांनी गोठे बांधून आज ११ महिने होऊन गेले तरी पूर्ण अनुदान त्यांच्या पदरात अजून पडलेले नाही.
Wardha News : ५१ म्हशींची अवैध वाहतूक करणारा कंटेनर पकडला, पाच जण अटकेत
१० शेतकऱ्यांचे रखडले अनुदान
पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारून शेतकरी मात्र बेजार झाला आहे गोठा बांधण्यासाठी लागणारे पत्रे, सिमेंट, रेती, विटा हे सर्व उसनवारी करून गोठे बांधले आणि आता शासन अनुदान देत नाही आहे. तळा पंचायत समितीकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत १० शेतकऱ्यांना जनावरांचे गोठे मंजूर करण्यात आले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान मिळावे यासाठी शेतकरी संघटनेने तळा पंचायत समितीचे तात्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी जठार यांची भेट घेतली होती शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, प्रसार माध्यमातूनही प्रशासनाच्या कारभारा विरोधात ताशेरे ओढल्यानंतर तळा पंचायत समिती कार्यालयाकडून रखडलेले अनुदान वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.
शेतकऱ्यांना कोण न्याय मिळवून देणार?
काम एक लाख ऐंशी हजाराचे मात्र पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून शेतकऱ्यांची बोळवण केली गेली, आजच्या घडीला तीन शेतकऱ्यांना १ लाख ३० हजार रुपये देण्यात आले आहेत अजूनही ७ शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे प्रशासन शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप लाभार्थी शेतकऱ्यांनी केला आहे. शासकीय कार्यालयातील दफ्तर दिरंगाई आणि योजनांतील त्रुटी शेतकऱ्यांच्या जिवावर उठत असल्याचे दिसत आहे. तळा पंचायत समितीला गेल्या वर्ष भरात तीन गटविकास अधिकारी लाभले पण एकाही शेतकऱ्यांचे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. तसेच आता शेतकऱ्यांना कोण न्याय मिळवून देणार का याकडेही संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.