Monday, February 17, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृती‘दत्त तोची स्मतृगामी’

‘दत्त तोची स्मतृगामी’

ऋतुराज – ऋतुजा केळकर

“त्रिगुणात्मक त्रैलोक्यधारी
सकल कामना पूर्ण करी
न तापदुःख तयासी काही
दत्त तोची स्मतृगामी”

लिहिता लिहिता लेखणी स्थब्ध झाली माझी. देवांचे देव महादेव, विश्वाचा निर्माता ब्रम्हदेव आणि विश्वाचा पसारा ज्याच्या कृपेने निर्विघ्नपणे चालू आहे अशा त्रिदेवांचे उगमस्थान म्हणजे ‘श्री गुरुदेव दत्त’. ज्याच्या इच्छेने अखिल सृष्टीचा उगम म्हणजे जन्म झाला, या आयुष्याला अर्थ मिळाला, ज्याच्या नुसत्या स्मरणमात्र आपल्या आत्म्याच्या आपल्या अस्तित्वाची चाहूल आपल्याला लागली त्या परमपित्या परमेश्वराचे मी कसे बरं वर्णन करू?

ज्या प्रमाणे मनाची जळमटे दूर करण्याकरिता गुरुचे बळ असणे गरजेचे आहे. पण याची जाणीव कित्येकांना नसते. जीवनाचे रहाट गाडगे योग्य पद्धतीने चालू राहावे म्हणून कोणीतरी निमित्त मात्र ठरते मग तो असतो ‘गुरु’, त्याच गुरूच्या गुरूंचे नाव आहे ‘श्री गुरु दत्तात्रय’.

श्रीदत्त म्हणजे तरी काय? दत्त या अक्षरांत पहिला शब्द येतो तो ‘द’. माझ्या अल्पमतीला वाटते की, ‘द’ म्हणजे आपल्यातील ‘दमन’ वासनाचे, अरिष्ट कामनांचे दमन करणे. कठीण आहे पण या जगात अशक्य असे काहीही नाही जर का एखाद्या अशिक्षित भाजीवालीचा मुलगा हा चार्टर्ट अकाउन्टंट होऊ शकतो तर मग हा तर, आपल्या वृत्तींना घालवायचा एक बांध आहे असं नाही का वाटत? या जगात सारेच जण हे कुठल्या ना कुठल्या कारणाकरिता जन्माला आलेले आहेत. प्रत्येकाचा कार्यभाग हा वेगवेगळा असला तरीही अंतिम ध्येय हे कामनापूर्ती आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली कायमची सुटका मग असे असताना मोहमयी भवसागरातून आपली सुटका करून घेण्याच्या दृष्टीने सर्व आधिव्याधी नष्ट होण्याकडे पूल टाकण्याऐवजी माणूस ऐहिक सुखाच्या लाटेवर पहुडला राहण्यात अधिक सुख मानतो. पण ज्याने संपूर्ण जगताचे मातृत्व स्वीकारले आहे त्या परब्रम्हाला जर आपण आपल्या बुद्धीचा वापर करून तसेच षडरीपुंचे दमन करून विवेक आणि वैराग्याची जोड दिली, तर पारमार्थिक उत्कर्ष नक्कीच होईल, ज्ञेय, दाता आणि ज्ञान याचे गणित आत्मसाद करून जो आत्मज्ञानाची हृदयातील निरांजनाच्या वाती आपल्या चैतन्यशक्तीने प्रज्वलित करतो त्याला या ‘द’ म्हणजे दमनाचा अर्थ पूर्णपणे समजून येतो.

भूतकाळाचा एक ढग प्रत्येकाच्या आयुष्याच्या आभाळात असतोच असतो. या अद्भुत ढगाचे रंग कधी काळे तर कधी सप्तरंगी असतात पण त्याच्या सावलीतून बाहेर पडण्यासाठीच मानवी जन्माचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घायचा असतो. कधीतरी अस्थिच्या विसर्जनाची वेळ प्रत्येकावर येणारच. मग त्यात आपल्या जन्माच्या घुघऱ्या तसेच मृत्यू नंतरचा पिठलं-भात आपल्याला कधीही खाता येत नाही आणि मुठी बंद करून आनंदाची लयलूट करण्याकरिता या जगाच्या प्रवाहाचा एक हिस्सा होण्याकरिता आलेलो आपण तो आनंद, आपले ते मौलिक विचारआचार इकडेच सोडून आपल्याला आलो तसेच परत मातीतच मिसळून धुक्यात विरघळून जायचे आहे हे सत्य जर ओळखले, तर अपरिहार्य अवस्थेतून कायमची सुटका करण्याकरिता आत्मा आणि शरीर या पेचात न पडता आपल्यातील या ‘द’ म्हणजे केविलवाणेपणा, पळपुटेपणा, वासना तसेच दुबळेपणा यांचे ‘दमन’ करून त्या अवधूत चिंतन श्री गुरु दत्तात्रयाच्या जवळ जाण्याकरीता एक पाऊल नक्कीच टाकेल.‘दत्त’ या शब्दातील दुसरे अक्षर म्हणजे अर्थातच ‘त’ माझ्या मते ‘त’ म्हणजे ‘तरणे’ दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ‘पोहणे’. या जीवनाच्या भवसागरातून व्यवस्थित तरुण जायचे असेल, जर का कुठलेही पाश मागे ठेवून जायचे नसेल, तर या दत्तमधील ‘त’ या शब्दाला नीट आत्मसाद करणे गरजेचे आहे. आत्म्याचा रंग हा एकवेळ आपण अगदी आपल्या जन्मदात्यापासून दडवू शकू पण कितीही मल्लीनाथी केली तरी त्या अक्कलकोटी जाण्याकरिता ‘अक्कल से ही जाना पडता है’. जीवनाच्या निसरड्या, पाऱ्याच्या वाटेवरून आयुष्याचे पेच सोडवत पुढे पुढे जाताना येणाऱ्या मोहमायेच्या काटेरी झुडूपात न अडकता सर्व ऋणांतून मुक्त होऊन म्हणजेच तरून जाण्याकरिता त्या दत्ताला शरण जावे जेणेकरून ज्याच्या चरणी वेद देखील नत आहेत तिथे आपण आपोआप पोहोचू.

अर्थात त्याकरिता प्रत्येकातच ती क्षमता असते आणि ती प्रत्येकाने कशी विकसित करायची किंबहुना ती विकसित करायची की नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे असते हेही तितकेच खरे आहे. कसे आहे ना की, पानातील हिरवेपण हे कधी ना कधी नष्ट होणारच हे जरी सत्य असले तरी ते चिरकाल टिकून राहण्याकरिता त्याचे खत करायचे की पाचोळा हे आपल्याच हातात असते नाही का? त्यामुळे पानगळ आणि ऋतुभुलीच्या या समीकरणाची ओळख चुटकीसरशी समजून घेऊन जीवनाच्या सांकेतिक सुक्ताचे ज्याला ज्ञान आहे त्या श्री दत्ताचा अविष्कार ज्याच्या सूक्ष्म आंतरिक नजरेला होईल तोच पानगळीत होणारा वृक्षाचा विलाप समजून उमजून त्या योग, धर्मकार्य आणि जीवनवादी उत्सवाचा उपभोग आणि उपयोग करून नाडीशुद्धी करून आपली शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्तीचा विकास त्या श्री दत्ताच्या कृपेने करू शकेल. त्या अवधुताला कायम शरण जाऊ शकेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -