पोल्ट्री व्यावसायिक भीतीच्या छायेत; बर्ड फ्लूमुळे मागणीत घट, आतापर्यंत १,१२५ पक्षांची विल्हेवाट
अलिबाग : उरण तालुक्यातील चिरनेर येथे परसदारातील कोंबड्यांची झालेली मरतूक ही एव्हियन इन्फ्लुएंझा अर्थात बर्ड फ्लुमुळे झाल्याचे निष्पन्न झाल्याने रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहेत. चिरनेर येथून सुरु झालेल्या बर्ड फ्लूची लागण इतर भागात होण्याची शक्यता असल्याने बाधित क्षेत्रातील निरोगी दिसणारे पाळीव पक्षी, पक्षांचे मांस, अंडी, विस्टा, तूस, भुसा इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश दिल्यानंतर आतापर्यंत १,१२५ पक्षांची विल्हेवाट करण्यात आली आहे.
बाधित क्षेत्रातून मृत व जिवंत पक्षी, खाद्य, मांस, विस्टा, उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास ९ फेब्रुवारीपर्यंत मनाई करण्यात आली आहे. याची अंमलबजावणी करण्याच्या सुचना पशुसंवर्धन, आरोग्य, महसूल, ग्रामविकास, पोलीस, वनविभाग, परिवहन इत्यादी विभागांच्या समन्वयाने बाधित क्षेत्रात कृती आराखड्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे. सदर रोगस्थिती नियंत्रणात असून, कुकुट व्यवसायिक व नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगण्याबाबत पशुसंवर्धन विभाग व जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
या संदर्भात ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने रायगड जिल्ह्यातील व्यावसायिक पोल्ट्री उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांना पोल्ट्री उत्पादनाचा पुरवठादार जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे. शेतीला अनेकांनी कुकुटपालनाची जोड दिल्याने जिल्ह्यात वर्षभरात ४० लाख २४ हजार कुकुट उत्पादन केले जाते. यातील ३० लाख ८५ हजार उत्पादन व्यावसायिक तत्वावर होते. या व्यावसायिक उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन हे वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून घेतले जाते. बर्ड फ्लूमुळे कमी होणाऱ्या किंमतीचा या कुकुटपालन कंपन्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
चिरनेर येथे परसदारातील कुक्कुट पक्षांमध्ये मरतूक आढळल्याने रोगनिदानासाठी नमुने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविण्यात आले होते. तेथून सदरचे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा, भोपाळ येथे रोग निदानास्तव पाठविण्यात आले होते. या प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षातील मरतूक बर्ड् फ्लू या रोगासाठी होकारार्थी आल्याचा अहवाल आल्यानंतर प्रशासनाने त्यानंतर उपाययोजना सुरु केल्या आहेत.
हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी चिरनेर परिसरात नागरिकांच्या आरोग्य तपासण्या केल्या जात आहेत. कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एक टीमने चिरनेर परिसरात नागरिकांच्या सोमवारपासून तपासण्या सुरु केल्या आहेत.
मानवामध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्याची काही लक्षणे दिसल्यास तात्काळ उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकर यांनी दिली. सध्यातरी एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.
उरण तालुक्यात जिल्ह्याच्या इतर तालुक्यांच्या प्रमाणात व्यावसायिक कुक्कुटपालन कमी प्रमाणात केले जाते. वर्षभरात साधारणत: जेमतेम आठ हजार पक्षी वाढवले जातात, तर त्याचवेळेला शेतकऱ्यांकडे परसातील पक्षांची संख्या एक लाखाच्या आसपास आहे. चिरनेर परिसरात परसातील घरगुती कुकुटपालन करणारे अनेकजण आहेत, त्यांना या साथीच्या रोगामुळे आपल्या पक्षांची विल्हेवाट लावावी लागणार आहे, त्याचबरोबर खाद्य, अंडी, विस्टा, खुराडा यांचीही विल्हेवाट लावावी लागणार आहे. चिरनेर गावातील बाधित ठिकाणापासूनच्या एक किलोमीटरमधील क्षेत्रातील सर्व पक्षांची विल्हेवाट लावल्यानंतर दहा किलोमीटर क्षेत्रातील पक्षाचे पुढील दोन महिने ठराविक दिवसानंतर सर्वेक्षण केले जाणार आहे. यात बर्ड फ्लूची लागण झालेल्या गावातील पक्षांची तत्काळ विल्हेवाट लावण्याच्या सुचना पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत.
मानवाला या साथरोगाची लागण काही प्रमाणात होऊ शकते. याची खबरदारी म्हणून आवश्यक उपचारासाठीचा औषधसाठा उपलब्ध आहे. चिरनेर परिसरात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून, उरण तालुक्यातील संशयीत रुग्णांचीही चाचणी केली जात आहे. – डॉ. विशाखा विखे (जिल्हा आरोग्य अधिकारी- रायगड)
चिरनेर येथे सुरु झालेली बर्ड फ्लूची साथ पूर्णपणे नियंत्रणात आहे. ही साथ शेतकऱ्यांच्या परसबागेत वाढणाऱ्या पक्षांनाच झालेली आहे. यापासून व्यावसायिक पोल्ट्री उत्पादक आतापर्यंत तरी दूर आहेत. सोमवारी दुपारपर्यंत १,१२५ पक्षांची आणि त्यांच्या साहित्याची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. चिरनेर गावाच्या हद्दीतच साठी खड्डा खोदण्यात आलेला आहे. – डॉ. सचिन देशपांडे, (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी- रायगड)